- केंद्र्रीय मंत्री स्मृती ईराणींनी साधला महिलांशी थेट संवाद
- विणकर महिलांना बुनियादी रिलींग मशीनचे वितरण
- विणकरांना मुद्रा लोन वाटपाचा शुभारंभ
नागपूरसह सहा राज्यातील विणकर महिलांना मिळणार बुनियादी यंत्र
नागपूर, दि. 8 : रेशीम व टसर उत्पादनामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग असून, पारंपारिक पध्दतीने उत्पादन न घेता त्यांना अत्याधुनिक बुनियादी रिलींग मशीन दिल्यामुळे उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होईल तसेच महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी महिला दिनानिमित्ताने विभागातील भंडारा व गडचिरोली येथील तीन महिलांना बुनियादी रिलींग मशीन देवून या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात वस्त्र मंत्रालय, केंद्रीय रेशीम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने विणकर महिलांना बुनियादी रिलींग मशीन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर श्रीमती नंदा जिचकार, विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमास मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती कादंबरी बलकवडे, वस्त्रोद्योग संचालक संजय मीना, केंद्रीय रेशीम बोर्डाचे वैज्ञानिक व प्रधान डॉ. प्रिय रंजन, रेशीम संचालक एन. पी. यंगलवार, उपसंचालक अर्जून गोरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव आदी उपस्थित होते.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी विणकर महिलांशी विज्ञान भवन येथे थेट संवाद साधतांना रेशीम व टसरच्या उत्पादनासाठी महिलांना आवश्यक असलेले बुनियादी रिलींग मशीन देण्यात येईल, तसेच मुद्रा लोनच्या माध्यमातून या क्षेत्रातील महिलांना अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील सुर्रा डोगरी येथील श्रीमती मीनाक्षी विशाल मेश्राम, भंडारा येथील किटाळाच्या श्रीमती अल्का खुशाल डोनाडे तसेच खडरंगीच्या श्रीमती अर्चना सोनबरते या महिलांशी संवाद साधून टसर उत्पादनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली तसेच सर्व महिलांना बुनियाद रिलींग मशीन देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
महिलांनी लघुउद्योगातून सक्षम व्हावे
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना प्रायोगिक तत्त्वावर तीन बुनियादी रिलींग मशीन महापौर श्रीमती नंदा जिचकार व विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना महापौर श्रीमती नंदा जिचकार म्हणाल्या की, महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:चा उद्योग सुरू करावा. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी शहराच्या मध्यभागी स्वतंत्र केंद्र सुरू करण्याच्या प्रस्ताव असून येथील महिलांना स्वयंरोजगाच्या प्रशिक्षणासोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
टसर सिल्क उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकास
विभागातील भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात टसर उत्पादनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विभागात पाच कोटी रेशीम कोश तयार होत असून, कोशापासून धागा व कपडा उत्पादनापर्यंतची प्रक्रिया येथेच तयार व्हावी. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी यावेळी केले.
नागपूर येथे रेशीम व टसरच्या उत्पादित केलेल्या कापडाच्या विक्रीसाठी मध्यवर्ती ठिकाणी केंद्रासाठी महानगरपालिकेने मदत करावी. अशी सूचना करताना विभागात दहा कोटी रेशीम व टसर कोश उत्पादन वाढविण्यासाठी वन विभागाचेही संपूर्ण सहकार्य घेण्यात येईल. महिला हीच रेशीम उत्पादनाची प्रमुख दुवा आहे. या व्यवसायाला पुढे नेण्याचे काम महिलांनीच केले असल्यामुळे विणकर महिलांना बुनियाद मशीनसह मुद्रा लोनच्या माध्यमातून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, असेही विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
वस्त्रोद्योग संचालक संजय मीना यांनी भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात टसर उत्पादनाच्या वाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रारंभी केंद्रीय रेशीम बोर्डाच्या सक्षम विकास विभागाचे समन्वयक डॉ. प्रिय रंजन यांनी स्वागत करून वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे टसर व रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांना बुनियादी मशीन प्रायोगिक तत्त्वावर वितरीत करण्यात येत आहे. टसर कोशापासून पारंपारिक पध्दती ऐवजी यंत्राद्वारे धागा तयार केल्यास चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ मिळू शकते. विणकर महिलांच्या मागणीनुसार हे यंत्र उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हा उपक्रम सुवर्ण जयंती ग्राम स्वराज्य योजना व महिला सक्षमीकरणांतर्गत राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
रेशीम बोर्डाचे पी.जे. कोलारकर यांनी आभार मानले.
*******
No comments:
Post a Comment