Friday 31 March 2017

अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मिहान प्रकल्प क्षेत्रात अधिक जागा देणार -- मुख्यमंत्री


विमानतळ विकास कंपनीच्या बैठकीत निर्णय
मुंबई, दि. 31 : विदर्भातील शेतकरी आणि आदिवासींच्या शेतकी तसेच वन उत्पादनांवर प्रक्रिया करुन अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मिहान प्रकल्प क्षेत्रात अतिरिक्त जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही जागा नवीन अन्न प्रक्रिया उद्योगांना उपलब्ध करुन दिली जाईल.
विधानभवनात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 58 वी बैठक झाली. या बैठकीस कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सीकॉमचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवासन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मिहान प्रकल्प क्षेत्रात पतंजली उद्योग समूहाला अन्न प्रक्रिया उद्योगासाठी जागा देण्यात आली आहे. त्यानंतर इतर अन्न प्रक्रिया उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात होत असलेली मागणी लक्षात घेता त्यांना मिहान प्रकल्प क्षेत्रात नियमानुसार अतिरिक्त जागा उपलब्ध करुन दिली जाईल. विदर्भातील शेतकरी आणि आदिवासींच्या शेतकी तसेच वन उत्पादनांना अधिकची बाजारपेठ मिळण्यासाठी तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
बैठकीत शिर्डी विमानतळाच्या कामाच्या प्रगतीबाबतही चर्चा झाली. या विमानतळाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून लवकरच या विमानतळाचे उद्घाटन करुन ते प्रवाशांच्या सेवेत खुले केले जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या सुविधेसाठी या विमानतळावरील धावपट्टीची लांबी 700 मीटरने वाढविण्याचा निर्णय झाला असून आता ही धावपट्टी 3200 मीटरची असेल. विमानतळाची उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करुन हे विमानतळ लोकांच्या सेवेत खुले करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. हे विमानतळ कार्यान्वित करण्यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक महासंचालकांकडे रीतसर अर्ज करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
पुरंदर (जि. पुणे) येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाबाबतही यावेळी चर्चा झाली. प्रकल्पग्रस्तांना चांगली भरपाई देऊन व त्यांचे योग्य पुनर्वसन करुन या विमानतळाच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
०००००    

No comments:

Post a Comment