Friday 31 March 2017

आशा स्वयंसेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्री यांची भेट घेणार – डॉ.दीपक सावंत

मुंबई, दि.30 : आशा  स्वयंसेविका या ग्रामीण आरोग्य अर्थव्यवस्थेच्या आत्मा आहेत. आशा स्वयंसेविकांमुळे ग्रामीण आरोग्य अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यामुळे आशा स्वयंसेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्री यांची भेट घेणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  डॉ.दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
आशा स्वयंसेविकांबाबतचे विविध प्रश्न आणि राज्य शासन करीत असलेली कार्यवाही याबाबतचा प्रश्न आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला. विधानपरिषद सदस्य संजय दत्त यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला.
या प्रश्नाला उत्तर देताना डॉ.सावंत यावेळी म्हणाले की, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत आशा स्वयंसेविकांची नेमणूक राज्यभरात करण्यात आली. आज आशा स्वयंसेविकांची एकूण 61,218 पदे मान्य आहेत. यापैकी 58,813 पदे भरण्यात आली आहेत. आशा स्वयंसेविकांचे काम हे योजनानिहाय असल्याने त्यानुसार त्यांना मानधन देण्यात येते.  सध्या 361 आशा स्वयंसेविकांना कामावरुन कमी करण्यात आले आहे, तर काहींनी स्वत:हून काम सोडले आहे. आशा स्वयंसेविकांना आरोग्य कामासाठी नियुक्त करण्याचा अधिकार नगर आणि ग्रामपंचायतीना आहे.
००००

No comments:

Post a Comment