Friday 28 April 2017

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसंदर्भात आजार शुल्काबाबत माहिती प्रसिध्द करावी - सचिन कुर्वे

  • योजनेतील विविध आजारावरील उपचाराचा आढावा
  • नोंदणीकृत 35 रुग्णालयांची अकस्माक तपासणी

नागपूर, दि.27 :    गरीब रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे हृदयरोगापासून इतर महत्वाच्या आजारासंदर्भात नोंदणीकृत झालेल्या जिल्हयातील 35 रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांना उपचारासंदर्भात संपूर्ण माहिती असावी यादृष्टीने उपचाराच्या शुल्कासंदर्भातील संपूर्ण माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज दिली.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा व उपचारासंदर्भात रुगणालयाकडून उपलब्ध सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. यु. बी. नवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाय.आर. सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी एल.टी. वार्डेकर, एन.आर. वंजारी, राजीव गांधी जीवनादायी आरोग्य योजनेचे फनिंद्र चंद्रा, डॉ. लोहित लांजेवार, निलेश बागडे आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्हयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसंदर्भात 35 हॉस्पीटल  नोंदणीकृत असून यामध्ये 4 शासकीय हॉस्पीटलचा समावेश आहे. 24 मल्टी स्पेशालिटी, 11 सिंगल स्पेशालिटी व 31 खाजगी रुग्णालय आहे. गरीब तसेच दारिद्रय रेषेखाली कुटुंबांना सुलभपणे आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित हॉस्पीटलला सुचना देण्यात आल्या असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, या सर्व रुग्णालयांमध्ये आकस्मीक तपासणी करावी. या तपासणीमध्ये योग्य उपचार होतो किंवा नाही याबाबतही पाहणी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक यु.बी. नवाडे, तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीचे फनिंद्र चंद्रा यांनी गरीब रुग्णांना या योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या उपचारासंदर्भात माहिती दिली.

00000000

No comments:

Post a Comment