Monday 31 July 2017

विधानसभा लक्षवेधी : अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत शासन सकारात्मक - महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे



मुंबईदि. 31 : राज्यात दोन लक्ष सात हजार अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभागासोबत बैठक घेण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात गठीत समितीचा अहवाल मार्च महिन्यात प्राप्त झाला. त्या अहवालानुसार वित्त विभागाला जून महिन्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावासंदर्भातच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
अंगणवाडी सेविकांमधील सेवाजेष्ठतेनुसार मानधनवाढ समितीने दिलेल्या अहवालात सुचविण्यात आली आहे. ही मानधनवाढ करताना कोणावरही अन्याय होणार नाही. अंगणवाडी सेविकांना केंद्र व राज्य शासनामार्फत मिळून एकत्रित मानधन देण्यात येते. यापूर्वी राज्याने 2014-15 मध्ये मानधनवाढ केली होती, त्यासाठी 264 कोटी रुपयांचा वित्तीय भार तिजोरीवर पडला होता.
अंगणवाडी सेविकांचामदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे मे 2017 पर्यंतचे मानधन अदा करण्यात आले असून जून 17 पासून पीएफएमएस प्रणालीद्वारे अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात मानधनाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मानधन विहित वेळेत सेविकांच्या बॅक खात्यावर जमा करण्याची दक्षता घेण्यात येईल, असेही त्यांनी उत्तरात सांगितले. मुंबई शहरात अंगणवाड्यासाठी  जागा उपलब्ध होत नाही ही बाब गंभीर आहे असे सांगून लोकसंख्येच्या आधारावर अंगणवाड्या देण्यात येण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल. राज्यात 18 हजार मिनी अंगणवाड्या असून त्यांचे अंगणवाड्यात रुपांतर करण्यासाठी केंद्राची परवानगी लागते. ज्या मिनी अंगणवाड्यामध्ये मुलांची संख्या चांगली असेल त्यांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू, असेही त्यांनी सांगितले.
या लक्षवेधी सूचनेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, भारत भालके, मनीषा चौधरी, अबू आजमी, शशिकांत शिंदे, कुणाल पाटील आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
००००

No comments:

Post a Comment