Thursday 31 August 2017

पाणीपुरवठा प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता मुरबाड तालुक्यातील 113 गावपाड्यांचा सुटणार पाणी टंचाईचा प्रश्न



मुंबई, दि. 31 : मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावे आणि पाड्यांना भावली व पिंपळगाव जोगे धरणातून पाणी पुरवठा करण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
            सह्याद्री अतिथीगृह येथे भावली व पिंपळगाव जोगे धरणातील पाण्याच्या आरक्षणासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे आदी उपस्थित होते.
            प्रारंभी मुरबाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या पाणी टंचाई संदर्भातील आढावा सादरीकरणाच्या माध्यमातून घेण्यात आला.
            ठाणे जिल्हा परिषदेने मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचा प्रस्ताव कुकडी सिंचन मंडळ, पुणे यांच्याकडे सादर केला होता. या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेकरिता पिंपळगाव जोगे धरणातून पाणी गुरुत्व वाहिनीने, ग्रीड पद्धतीने नेण्याचे प्रस्तावित केलेले आहे. कुकडी प्रकल्प हा आठमाही प्रकल्प असून, कुकडीच्या संयुक्त प्रकल्पातील पिंपळगाव जोगे धरण आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे मुरबाड तालुक्यातील 113 गावपाड्यांच्या पाणी टंचाईचा प्रश्न दूर होणार आहे. जवळपास 1 लाख 60 हजार लोकांना याचा फायदा होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, लाभक्षेत्र विकासचे सचिव च. आ. बिराजदार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा. ब. धोटे, सिंचन व्यवस्थापनचे उपसचिव संजीव टाटू आदी उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment