Thursday 31 August 2017

अतिवृष्टीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झालेल्या नुकसानीचा वनमंत्र्यांची घेतला आढावा अर्थसहाय्याची मागणी करणारा प्रस्ताव त्वरित पाठवण्याच्या सूचना


 मुंबई दि. ३१ : अतिवृष्टीने बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झालेल्या नुकसानीचा आढावा आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्यानातील अनेक बाबींचे नुकसान झाले असल्याने, नुकसान झालेल्या मालमत्ता पुन:स्थितीत आणण्यासाठी अर्थसहाय्याची मागणी करणारा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावा,  अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
आपत्कालीन परिस्थितीत कार्यालयीन कर्मचारी आणि शासकीय निवासस्थानातील त्यांचे कुटुंबीय यांना तातडीने सुरक्षित जागेत हलवण्याच्या सूचना वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी उद्यानातील कार्यालयीन व निवासी इमारतीत्यातील काही सामानउद्यानाच्या संरक्षक भिंती आणि कुंपणशासकीय वाहनेउद्यानातील साईन बोर्डहोर्डिंग्ज,  मिनी ट्रेन चा ट्रॅक यांचे नुकसान झाले आहे.  सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे उद्यानातील ५० मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भूरळ पाडणारे उद्यान असून उद्यानाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटक भेट देत असतात. अतिवृष्टीने उद्यानातील नुकसान झालेल्या सर्व घटकांची पुन:स्थापना करण्यात येऊन उद्यानाचे वैभव पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात यावेतअसे आदेश ही वनमंत्र्यांनी यावेळी दिले.
००००

No comments:

Post a Comment