Tuesday 31 October 2017

राष्ट्रीय एकता दौड एकतेला, एकात्मतेला समर्पित करणारी

 सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

        नागपूर दि. 31 :  नेहरु युवा केंद्र, केंद्रीय खेळ मंत्रालय तथा केंद्रीय रिझर्व पोलिस बल यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन  करण्यात आले होते. दौडचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार, पोलिस उपमहानिरीक्षक संजय कुमार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.  
            यावेळी सीआरपीएफ कमांडन्ट मनोज ध्यानी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप लोणारे, असिस्टंट कमांडर सुबोध कुमार, हरिनारायण, सुनील पाटील, नेहरु युवा केंद्राचे युवा समन्वयक शरद साळुंके, निस्वार्थ अखंड सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन घोडे, लाईट ऑफ होप फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय पाटील, स्पर्श जनहिताय बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कपिलकुमार  आदमाने उपस्थित होते.
            दौडला बास्केट बॉल ग्राऊंड, बजाज नगर येथून प्रारंभ झाला. व्हीएनआयटी गेट, अभ्यंकर नगर चौक येथून मार्गक्रमण करत कस्तुरबा भवन येथे दौडचा समारोप करण्यात आला. दौडमध्ये  सीआरपीएफचे 85 कमांडर, नेहरु युवा केंद्राचे सदस्य, औद्योगि‍क प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, निस्वार्थ फाऊंडेशनचे सदस्य, लाईट ऑफ होप फाऊंडेशनचे सदस्य, राजीव गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. उपस्थितांना नेहरु युवा केंद्राचे युवा समन्वयक शरद साळुंके यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
             सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात येते. ही दौड एकतेला, एकात्मतेला समर्पित असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
            प्रारंभी प्रास्ताविक युवा समन्वय शरद साळुंके यांनी केले. संचालन राखी उके यांनी तर, आभार कपिलकुमार आदमाने यांनी मानले.
******

No comments:

Post a Comment