पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष नुकसानीची केली पाहणी
नुकसानीचे प्राथमिक अंदाज तात्काळ सादर करा
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
नुकसानीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्यांच्या सह्या घ्या
नागपूर, दि.13 अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात झालेल्या
गारपिटीमुळे काटोल, नरखेड तसेच जिल्हयातील सुमारे 125 गावातील गहू, हरबरा आदि पिकांसह संत्रा,मोसंबी, केळी, आंबा ,आदि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भातील प्राथमिक अंदाज तात्काळ सादर करण्याच्या सूचना करताना आकस्मिकवर ओढवलेल्या नैसर्गिक संकटाप्रसंगी शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून मदतीची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच शेतकऱ्यावर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीप्रसंगी शेतकऱ्यांना दिलासा दिला. पालकमंत्री यांनी आज सकाळी नरखेड तालुक्यातील भदाडे मोहगाव या गावाला भेट दिली. तसेच सुरेश कोल्हे यांच्या शेतातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या गहू पिकाची पाहणी केली. सायंकाळी 7.30 वाजता गारा पडण्याला सुरवात झाली. लिंबापेक्षा मोठ्या गारांच्या आकारामुळे शेतातील पिके, घरांचे नुकसान तसेच पशुधनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, डॉ राजीव पोतदार, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, नरखेडचे सभापती राजू हरणे, काटोलचे संदिप सरोदे, किशोर रेवतकर, उपविभागीय अधिकारी विशाल ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलीद शेंडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडगाव, केदारपूर, सावळी पर्वत, लिंगा, आग्रा,आदि गावातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली शेतात संत्र्याचा संपूर्ण बहार गारपिटीच्या मारामुळे जमिनीवर पडला असून मृग बहारासह अबिंया बहाराचे नुकसान झाले आहे. मृगबहाराचे संत्रा झाडावर विक्रीसाठी तयार असतांना शेतकऱ्यावर संकट कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशनास आणून दिले.
शेतातील फळझाडे व गहू, हरबरा, आदि पिकांच्या नुकसानी सोबतच घरांचे व पशुधनाचेसुध्दा नुकसान झाले आहे. सरपंच श्रीमती काना विनायक कोल्हे यांनी शेतातील संपूर्ण बाग गारपिटीच्या माऱ्यामुळे नष्ट झाली असून झाडावरील संत्रीसुध्दा गळून पडत आहे. त्यामुळे पाच लाखापेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
24 तासात प्राथमिक अंदाज द्या
शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा फळबागासह इतर पिकांच्या नुकसानीसंदर्भात चोवीस तासात प्राथमिक अंदाज सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. फळबाग, शेतातील इतर सर्व पिके, घरांचे व पशुधनाच्या नुकसानीचे सर्वेक्षण येत्या दोन दिवसात पूर्ण करावेत, असे निर्देश देतांना नुकसानीचे पंचनामा करतांना तलाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्यासोबतच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनीसुध्दा पंचनाम्यावर अशा सही द्यावी, असे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले
काटोल नरखेड परिसरातील संत्रा, फळबागासह ईतर पिकांच्या नुकासानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण अहवाल सादर करुन शेतकऱ्यांना मदतीबाबत लवकर निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे तत्काळ पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
शेतातील पिकांच्या विमा काढण्यासंदर्भात ज्या बँकांनी टाळाटाळ केली अशा बँका विरुध्द कारवाई करण्याच्या सूचना करतांना पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी केली. काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस बोंडअळीच्या सर्वेक्षणाबाबत केलेली मागणी मान्य करुन यासंदर्भात सूचना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले .
काटोल : 17 गावांना तडाखा
काटोल तालुक्यातील प्राथमिक अंदाज सुमारे 17 ते 20 गावांना गारपिटीच्या मोठया प्रमाणात सडा पडला असून सुमारे दहा हजार पाचशे हेक्टरमधील फळबाग व पिकाचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे 1 हजार हेक्टर संत्रा व फळबाग दीड हजार हेक्टर क्षेत्रातील गहू हरभरा, भाजीपाला आणि पिकांचा समावेश आहे.
केदारपूर, लाडगाव संत्र्याची मोठी हानी
काटोल तालुक्यातील केदारपूर, लाडगाव, लिंगा या गावातील संत्रा झाडाची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. संत्र्याचा पूर्ण बहार जमिनीवर पडला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
संत्रा हे नगदी पिक असल्यामुळे शेतकरी बहार येताना संपूर्ण बागेची विक्री करतात. गारपिटमुळे बागच नष्ट झाली. रामभाऊ मानकर यांच्या चार एकर शेतातील संपूर्ण बागेतील संत्रा जमिनीवर पडून नष्ट झाला केदारपूर येथील सुभाष विठ्ठलराव राऊत यांची संत्रा बाग तसेच गहू पिकाचे नुकसान झाले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
केळीची बाग नष्ट झाली
लिंगा येथील विनायक पाहोकर यांनी दिड एकरात केळीची बाग फुलविली होती. दोन वर्षापासून केळीपासून उत्पन्न सुरु झाले होते. केळी बहारात असतांनाच गारपिटमुळे संपूर्ण बाग नष्ट झाली. त्यामुळे साडेतीन लक्ष रुपयांचे नुकसान तर झालेच पण ही बाग आता यापुढे बहरणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी दिला दिलासा
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यावर जे संकट ओढावले आहे, या संकटावर मात करण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी शासन आपल्या पाठीशी उभे राहील, अशी गवाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिली. गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न समजावून घेतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदतीची गवाही दिली.
********
No comments:
Post a Comment