Thursday, 15 February 2018

राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त अशा महत्वाकांक्षी उपक्रमास यशस्वी करावे - उद्योगमंत्री सुभाष देसाई


मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018

          दहा लाख कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट
          साडेचार हजार सामंजस्य करार होणार
          35 लाख रोजगार निर्मितीची संधी
          सन 2025 पर्यंत ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी बनण्याकडे वाटचालीसाठीचे आश्वासक पाऊल
          भारतातील औद्योगिक गुंतवणुकीसाठी महारष्ट्राचा गेट वे तयार
          भरघोस गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती
          नव्या युगातील उद्योजकांना प्रोत्साहन
          प्रगतीचा प्रादेशिक समतोल.

            मुंबई, दि. 15; राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018 या जागतिक गुंतवणुक परिषदेस सर्वांनी सहभाग नोंदवून यशस्वी करावे असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. येत्या 18 तारखेला एमएमआरडीए च्या प्रांगणात होणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र -कन्व्हर्जन्स 2018 या परिषदेचे उद्‍घाटन प्रधानमंत्री नरेंद्रमोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेची माहिती आज उद्योगमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र औद्योगिक महामंडाळाचे मुख्य कार्यकारी संचालक संजय सेठी उपस्थित होते.
            श्री देसाई पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात येत आहे. यापुर्वी मेक इन इंडिया या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. सन 2016 मध्ये आयोजित या परिषदेत आठ लाख कोटी रुपयांचे सामजस्य करार करण्यात आले होते, त्यापैकी सुमारे 61 टक्के करारांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून 10 लक्ष कोटी रुपयांच्या उद्योगांच्या आश्वासनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर सुमारे साडेचारे हजार सामजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याचे नियोजित आहे.यातून 35 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
            पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये राज्य अग्रेसर असून औरंगाबाद, नागपूर, नगर या ठिकाणी अद्ययावत औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी   लागणा-या आयुधांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योग उभारणीसाठी लागणा-या सर्व परवानग्या एकत्रीतपणे मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मैत्रीया एक खिडकी योजनेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आसून राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार झाले आहे.
            राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी 12 नवीन धोरण जाहीर करण्यात आली आहेत. यात लॉजिस्टीक पार्क, वस्त्रोद्योग, फिन्टेक, जी. एस. टी. साठीचे धोरण इत्यादींचा समावेश आहे. राज्य औद्योगिक धोरणालाही सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.रोजगार निर्मितीसह कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. उद्योग विभागाच्या अखत्यारितील जागांवर दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. असेही श्री देसाई यांनी सांगितले.
महा उद्योगरत्न पुरस्कार रजनी
            राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या उद्योजकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018 या परिषदेत दुस-या दिवशी 19 फेब्रुवारीला एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञान, निर्यात या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील 47 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
            यासोबतच राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या आयोजित  मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर 30या स्पर्धेच्या विजेत्यांना मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 स्टार्टअप अवार्डस अंडर 30हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरुपः
18 फेब्रुवारी-
            मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए ग्राऊंड येथे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित या परिषदेचे उद्‍घाटन 18 फेब्रुवारीला सायंकाळी 5.45 मिनिटांनी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रदर्शनाचे उद्‍घाटन 7.15 मिनिटांनी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उपस्थित असतील. याच दिवशी मोठ्या कंपन्यांच्या निवडक सिईओंसह प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. सायंकाळी 7.45 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
19 फेब्रुवारी-
            सकाळी दहा वाजल्या पासून विविध चर्चासत्रांना सुरुवात होणार आहे यात प्रामुख्याने फ्युचर इंडस्ट्री, सस्टेनेबिलीटी, एम्प्लॉयमेंट आणि इंफ्रास्ट्रक्चर याविषयांवर चर्चा होणार आहे यात नवे तंत्रज्ञान, स्मार्ट सिटीज, निर्यात, सप्लाय चेन सह जर्नी टू ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीहा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद होणार आहे. सायंकाळी स्टार्टअप पुरस्कार आणि उद्योगरत्न पुरस्कार रजनी होणार आहे.
20 फेब्रुवारी
            सकाळी दहा वाजल्या पासून तीन हॉल मध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रे होणार आहेत. यात जलसंधारण, महिला उद्योगधोरण, इज आफ डुईंग बिजनेस, मुंबई फायनान्शियल हब, मेक इन महाराष्ट्र 2.0 यांचा समावेश आहे. सायंकाळी 4.30 वाजता परिषदेचा सांगता समारोह होणार आहे.
हे प्रदर्शन दि.23 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
000

No comments:

Post a Comment