Sunday, 18 March 2018

सिंधू आर्ट गॅलरी लवकरच साकारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






  
 चेट्रीचंड महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
   सिंधू संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन

        नागपूर, दि. 18 :  सिंधू संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती असून या संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविण्यासाठी नागपूर येथे सिंधू आर्ट गॅलरी लवकरच साकारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            जरीपटका येथील दयानंद चौक येथे भारतीय सिंधू सभेच्यावतीने चेट्रीचंड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.मिलिंद माने, स्थायी समिती अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, घनश्याम कुकरेजा, महेंद्र धनविजय, सुषमाताई चौधरी, प्रमिलाताई मोटवानी, महेश साधवानी, गोपाल खेमानी, विजय केवलरमानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
            झुलेलाल महाराज यांच्या आरती समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवर सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त सिंधी समाजास चेट्रीचंड महोत्सवाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात सिंधी भाषेतून करुन उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चेट्रीचंड हे आनंदपर्व आहे. सिंधू संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती असून चेट्रीचंड महोत्सवाद्वारे ही संस्कृती जतन करण्याचे महत्वपूर्ण कार्य होते. सिंधी समाज संघर्षातून पुढे आला असून मोठ्या मेहनतीने व्यापारात अग्रेसर आहे. सिंधी समाजाच्या लीजपट्ट्यासंदर्भातील अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, यासाठी लवकरच एक गटही स्थापन करण्यात येईल. सिंधू आर्ट गॅलरी साकारण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, या आर्ट गॅलरीमध्ये सिंधू संस्कृतीत झालेला नगरविकास तसेच समग्र सिंधू संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
            स्थायी समिती अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा म्हणाले, भारतीय सिंधू सभेतर्फे चेट्रीचंड महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सिंधी भाषेच्या व संस्कृतीच्या विकासासाठीही भारतीय सिंधू सभेमार्फत मोलाचे कार्य करण्यात येत असल्याचे श्री. कुकरेजा यांनी सांगितले.
            यावेळी आयपीएस अधिकारी लोहीत मटानी यांच्या पुस्तकांचे विमोचन तसेच विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सिंधू संस्कृतीचा इतिहास, विविध वैशिष्ट्ये व समाजजीवन दर्शविणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे यावेळी आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली.
00000000

No comments:

Post a Comment