* स्कुल बस सुरक्षा समितीची बैठक
नागपूर, दि.05 : शालेय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस वापरतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला
सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी बस चालकांकडे अद्यायावत फिटनेस सर्टीफिकेट असणे, अनिवार्य आहे. जिल्ह्यातील सर्व
स्कूल बस चालकांनी सुरक्षिततेसंदर्भात अद्यायावत फिटनेस प्रमाणपत्र सोबत
बाळगण्याची सूचना जिल्हा स्कूल बस सुरक्षा समिती तर्फे करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या सभाकक्षात जिल्हा स्कूल
बस सुरक्षितता समितीची बैठक अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राऊत यांच्या
अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद
वाडेकर, उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. रुपकुमार बेलसरे, उपविभागीय
पोलीस अधिकारी सर्वश्री ईश्वर कातकडे, विजय मराठे, विक्रम कदम, लोहित मतानी, वाहतुक
शाखा ग्रामीण पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक सतीश
सोनटक्के, स्कूल बस संघटनेचे पदाधिकारी समर जोग, विकास पाटील, संजीव बायस्कर आदी उपस्थित होते.
शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा निहाय समिती स्थापन करण्यात आली आहे. या
समितीच्या माध्यमातून स्कूल बसने प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांची सुरक्षितता यावर
गांभिर्याने लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात
चालणाऱ्या प्रत्येक स्कूल बस-व्हॅन चालकाकडे फिटनेस सर्टीफिकेट, संबंधित स्कूल बस मालकाकडे चालकांची
आवश्यक कागदपत्रासह संपूर्ण माहिती, बस-व्हॅन मध्ये जीपीएस
सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असणे आवश्यक आहे. याशिवाय वाहन चालक बस किंवा
व्हॅन अधिक वेगाने चालवणार नाही, याची दक्षता स्कूल बस
मालकासोबतच संघटनेने देखील घ्यावी, अशा सूचना अपर पोलीस
अधिक्षक ग्रामीण श्रीमती मोनिका राऊत यांनी केल्या.
शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक शाळेत परिवहन समितीची स्थापना करण्यात आली आहे
किंवा नाही यांची तपासणी करावी. समितीची संपूर्ण माहिती पोलीस तसेच प्रादेशिक
परिवहन विभागाला द्यावी. स्कूल बस चालकाने आरसी बुक, इन्शुरन्स, पीयुसी, फिटनेस
सर्टीफिकेट, परमीट आदी कागदपत्राच्या मुळ प्रती स्वत: जवळ
बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय स्कूल बस-व्हॅन मालकांनी किमान 5 ते 10 वर्षे स्कूल बस चालविण्याचा अनुभव असलेल्या
व्यक्तीस चालक म्हणून जबाबदारी सोपवावी, अशी माहिती उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. रुपकुमार बेलसरे यांनी दिली. उपस्थित अधिकाऱ्यांनी
स्कूल बस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्याचे निराकरण करीत त्यांना
विविध सूचना करण्यात आल्या.
00000


No comments:
Post a Comment