Tuesday 31 July 2018

मातामृत्यूदर कमी करण्यासाठी खासगी डॉक्टरांची आरोग्यमंत्र्यांनी घेतली बैठक


पालघर जिल्ह्यात गुरुवारपासून
मोटर बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ
मुंबई, दि. 31 : पालघर जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा मिळावी. कुपोषित बालके, गरोदर मातांना वैद्यकीय उपचार वेळेत मिळण्यासाठी गुरुवार 2 ऑगस्टपासून या भागात मोटर बाईक ॲम्ब्युलन्स सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.
पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या दाल

नात बैठक झाली. यावेळी विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासह पालघर जिल्ह्यातील खासगी व्यवसाय करणाऱ्या स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते.
वर्षभरापूर्वी मुंबई येथे 10 मोटर बाईक ॲम्ब्युलन्सचा शुभारंभ करण्यात करण्यात आला. त्यामाध्यमातून हजारो नागरिकांना आपतकालीन वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली. त्यानंतर या सेवेला मिळालेले यश पाहता महाराष्ट्रात नव्याने 30 बाईक ॲम्ब्युलन्स सुरु करण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यामध्ये मुंबईत मे महिन्यात नवीन 10 बाईक ॲम्ब्युलन्स सुरु करण्यात आल्या. मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच बाईक ॲम्ब्युलन्स सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालघर येथे 2 ऑगस्टपासून बाईक ॲम्ब्युलन्सची सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन मोबाईल मेडिकल युनिट देखील सुरु केले जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
एरवी बाईक ॲम्ब्युलन्ससाठी 108 क्रमांक फिरवावा लागतो. मात्र पालघर जिल्ह्यात या ॲम्बुलन्सना ठराविक पाड्यांना भेट देण्याबाबतचे वेळापत्रक करुन देण्यात येणार असून त्यामुळे ज्या भागात चारचाकी वाहन पोहोचू शकत नाही अशा दुर्गम पाड्यांवर या बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. विशेष करुन गरोदर माता व कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी या सेवेचा वापर करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आज मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये आरोग्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यामध्येमातामृत्यू रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. शासकीय यंत्रणेने खासगी व्यवसाय करणाऱ्या स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची मदत घ्यावी. ज्या शासकीय रुग्णालयात, उपकेंद्रात स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसेल अशा वेळेस खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून उपचाराची सुविधा निर्माण करावी. गरोदर मातांमध्ये ॲनिमियाचे मोठे प्रमाण आढळून येत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी गोळ्यांसोबत इंजेक्शन देण्याच्या पर्यायावर विचार करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दुर्गम भागातील शासकीय रुग्णालयातून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला अन्य खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा वापर करु देण्यासाठी पालघर जिल्ह्यात विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येईल. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची शिफारस ग्राह्य मानली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या भागातील मातामृत्यूदर कमी करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी खासगी डॉक्टरांनी विविध सूचना केल्या.
००००

No comments:

Post a Comment