Thursday, 27 September 2018

29 सप्टेंबर आता शौर्य दिन


मुंबई, दि. 27 : 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकदवारे अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे 29 सप्टेंबर हा दिवस भारतवासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत. भारतीय सैनिकांचे काम हे निश्चितच गौरवाचे, कर्तृत्वाचे आणि अभिमानाचे असून यांचे फार मोठे ऋण आपल्यावर आहेत. भारतीय सैनिकांचा सन्मान आणि सत्कार या भावनेतून शौर्य दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. आपल्याला सैनिकांप्रती असलेली भावना अधिक वृध्दीगंत होण्यास मदत होणार आहे.
शौर्य दिनाच्या निमित्ताने सैनिकांप्रती आपल्याला असलेली आदराची भावना अधिक वृध्दीगंत व्हावी यासाठी सर्व जिल्हाधिकारी /जिल्हा सैनिक अधिकारी यांनी त्यांच्या जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिकांच्या विधवा/शहीद जवानांचे कुटुंबिय यांना शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास सन्मानपूर्वक निमंत्रित करुन त्यांचा यशोचित सत्कार करावा. शौर्य दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रम माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करावा. तसेच या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सदस्यापासून ते सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना आमंत्रित करावे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटनांशी समन्वय करावा. आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांसोबत शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी यांनी सेल्फी काढून फोटोज अपलोड करावे. तसेच फोटो/व्हिडिओ क्लीप्स त्याच दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत माजी सैनिक कल्याण विभागाचे संचालक यांना पाठवावे.
0 0 0

No comments:

Post a Comment