Saturday 29 September 2018

६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी येथे पुरेशा सुविधा उपलब्ध करा - अश्विन मुदगल


* विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर, दि. 29 : 62व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी तसेच ड्रॅगन पॅलेस येथे दि. 18 ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.   
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज 62व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उपायुक्त संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, पोलीस उपायुक्त हर्ष पोतदार, दीक्षाभूमीचे ट्रस्टी विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
दीक्षाभूमी येथे दरवर्षी प्रमाणे 7 लाखापर्यंत अनुयायी उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, 24 तास वीजपुरवठा, भाविकांसाठी बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डींग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा विविध सुविधा येथे संबंधित विभागांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
दीक्षाभूमीतसेच ड्रॅगन पॅलेसयेथे दिनांक 14 ते 19 ऑक्टोबर दरम्यान भाविकांची उपस्थिती राहणार आहे. या दरम्यान तसेच कार्यक्रम समाप्तीनंतर परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिल्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
दीक्षाभूमी येथे 62 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा एकदिवसीय अर्थात 18 ऑक्टोबर रोजी असला तरी भाविकांची गर्दी 14 ऑक्टोबरपासून वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु द्याव्यात, असे डॉ. सुधीर फुलझेले यांनी सांगितले.
*****

No comments:

Post a Comment