मुंबई, दि. 27:महाराष्ट्र
उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून भविष्यात हे स्थान कायम ठेवण्यासाठी उत्पादन
क्षेत्राला शासन प्रोत्साहन देत असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे
सांगितले. इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्र समुहाच्यावतीने आयोजित ‘प्लॅन्ट लिडरशिप समिट’ या विषयावरील दोन
दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत
होते. या परिषदेत ‘उत्पादन
क्षेत्रासमोरील आव्हाने’ या विषयावर चर्चा करण्यात आली.
उत्पादन क्षेत्राच्या
वाढीसाठी राज्य शासन जमीन, पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देत असून विविध कंपन्यांनी
आपली गुंतवणूक वाढवून महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायम अग्रस्थानी ठेवावे. या
क्षेत्रापुढील नवनवीन आव्हानावर चर्चा करून उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांनी
त्याबाबतच्या सूचना, माहिती
राज्य शासनाला कळविण्याचे आवाहन श्री. देसाई यांनी केले. राज्याचे नवीन औद्योगिक
धोरण ठरवताना शासन, उद्योग
विभाग या सूचनांवर काम करून उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी काय प्रयत्न करता येतील, याचा विचार करेल, असेही श्री. देसाई
यांनी सांगितले.
सध्या उत्पादन क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज
असून यासाठी राज्यात 600 कौशल्ये विकास केंद्रे सुरू केली आहेत. औद्योगिक
प्रशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रमाचे स्वरुप बदलण्यात आले असून विद्यार्थ्यांना थेट
मोठ-मोठ्या कंपन्यामध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी काही मोठ्या कंपन्यांसोबत
करार करण्यात आल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. याद्वारे कंपन्यांना स्थानिक
प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
याशिवाय शासन उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी काही ठिकाणी
विशेष वसाहत विकसित करीत आहे. याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रे
येथे डीएमआयसी (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर) विकसित करण्यात आलेली आहे.
येत्या काही दिवसांत दिघी येथे आणखी एक विशेष औद्योगिक वसाहत विकसित केली जाणार
आहे,
असे
श्री. देसाई यांनी सांगितले.
इकॉनॉमिक टाइम्सचे व्यवस्थापक आशिष चौहान यांनी प्रास्ताविक
केले. या परिषदेसाठी देशभरातील उत्पादन क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
००००



No comments:
Post a Comment