Monday, 10 September 2018

राज्यातील बीएएमएस डॉक्टरांना व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे

- राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची न्यू साऊथ वेल्सच्या आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई, दि. 10 : महाराष्ट्रातील नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तसेच माता व अर्भक मृत्यू रोखण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे राज्यातील बी.ए.एम.एस डॉक्टरांना व्हर्च्युअल क्लासरुमच्या मदतीने कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स प्रांताचे आरोग्यमंत्र्यांना केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद भविष्यात या क्षेत्रात ऑस्ट्रेलिया सहकार्य करेल असे न्यू साऊथ वेल्सचे आरोग्यमंत्री ब्रॅड हॅझर्ड यांनी सांगितले.
मंत्रालयात आज न्यू साऊथ वेल्स प्रांताचे आरोग्यमंत्री श्री. हॅझर्ड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्यपध्दती, विविध योजना व त्यांची अंमलबजावणी याबाबत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स प्रांतात देखील डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याचे सांगत त्यावर टेलीमेडिसनचा वापर करीत मात केली जात असल्याचे श्री. हॅझर्ड यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या मोटर बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचे कौतुक केले. लोकसंख्येची आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था कार्यक्षम असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले, राज्यातील दुर्गम भागातील अर्भक मृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे. या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने देण्यासाठी सहकार्य करावे. त्याचबरोबर राज्यातील आरोग्य विभागात सेवा बजावणाऱ्या बी.ए.एम.एस. डॉक्टरांना आपत्कालीन परिस्थितीत वैदकीय उपचार पध्दतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत व्हर्च्यूअल क्लासरुमच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य विभागाचे आयुक्त परिमल सिंग, शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.
                                                                   0000

No comments:

Post a Comment