Wednesday 31 October 2018

विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार - विनोद तावडे


पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

मुंबई, दि. 31 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 नुसार महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. लिंगडोह समितीच्या शिफारशी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविद्यालयीन आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षात 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

आज मंत्रालयात विद्यार्थी निवडणूका संदर्भातील पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा श्री. तावडे यांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठ निवडणुकासंदर्भातील माहिती दिली.
श्री. तावडे यांनी सांगितलेविद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम 31 जुलै पूर्वी घोषित करण्यात येईल आणि शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर पूर्वी विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठित करण्यात येईल. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठीची व महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक सरळ बहुमताच्या तत्वानुसार घेण्यात येईल. संबंधित विद्यापीठामध्ये विद्यापीठ विभाग तसेच सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक एकाच दिवशी घेण्यात येईल. महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्षसचिवमहिला प्रतिनिधी आणि आरक्षित संवर्ग प्रतिनिधींची निवड विद्यार्थी थेट मतदानाद्वारे करतील. तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड चार महाविद्यालय प्रतिनिधी करतील. ही प्रक्रिया दरवर्षी कालबध्द पध्दतीने व कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप टाळून राबविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालय विद्यार्थी परिषद यांच्या निवडणूकीच्या बाबतीत मतमोजणी आणि निकालाची घोषणा मतदानाच्या दिवशीच करण्यात येईल.
निवडणू‍क लढविण्याकरिता विद्यार्थ्यांने महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या पूर्ण वेळ मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्षात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने मागील कोणताही विषय शिल्लक न ठेवता किंवा सत्र पुढे चालू ठेवण्याची मुभा न घेता अगोदरच्या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थी एकाच वर्गात पुन:प्रवेश घेतलेला नसावा तसेच निवडणुका लढविण्यासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादाही त्या शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर रोजी त्याच्या वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment