एम. एस. एम. ई. ने पुढाकार घेऊन लघु उद्योगांना द्यावी चालना
मुंबई, दि. 29 : प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र चे मॉडेल देशाचेच नाही तर विश्वाचे मॉडेल व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त
करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
मिनिस्ट्री फॉर मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजने
पुढाकार घेऊन राज्यात लहान लहान उद्योगांना चालना द्यावी, असे आवाहन केले.
मुंबईत फिक्कीतर्फे आयोजित 6 व्या “प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र 2018, डबलिंग द इकॉनॉमिक ग्रोथ, वे फॉरवर्ड टू सस्टनेबल जॉब क्रियेशन
फॉर अ ट्रीलियन डॉलर इकॉनॉमी” या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, युवकांना सक्षम आणि रोजगारयुक्त करण्यासाठी त्यांनी चंद्रपूर येथे एका
कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात 38 हजार लोकांनी नोंदणी केली. त्यात मोठ्या प्रमाणात
युवक-युवतींचा समावेश होता. महिलांचा सहभाग ही उल्लेखनीय होता. सूक्ष्म, लघु आणि मध्यम
उद्योगांमध्ये महिलांचे प्रमाण वाढले
पाहिजे. त्यासाठी एम. एस. एम.ई. ने
पुढाकार घ्यावा, आर्थिक स्वातंत्र्य या
विषयावर देशभर चिंतन घडवून आणावे. अशी विकेंद्रित व्यवस्था निर्माण झाली तरच समाज विषमतामुक्तीकडे वाटचाल करू लागेल.
संयुक्त राष्ट्र संघाने आता दरडोई उत्पन्नापेक्षा दरडोई आनंद, समाधान या बाबीला महत्व
दिले आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, भारत माता की जय
म्हणताना प्रत्येक भारतीयांची जी भावना असते त्याला पूरक कृती त्याच्याकडून
होणे अपेक्षित आहे. भयमुक्त, भूकमुक्त आणि विषमतामुक्तीकडे घेऊन
जाण्यासाठी, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया
यामधील दरी सांधणे गरजेचे आहे, ती छोट्या छोट्या उद्योगातूनच सांधता येईल.
शासन महिला उद्योजकांना ही प्रोत्साहन देत आहे. सध्या महाराष्ट्रात 9
टक्क्यांपेक्षा कमी महिला उद्योजकांची संख्या आहे ती 20 टक्क्यांपर्यंत
वाढवण्यासाठी शासनाने प्रगतीशील महिला उद्योग धोरण जाहीर केले आहे. महिला या
मुळातच उत्तम व्यवस्थापक असतात, यशस्वी उद्योजक होण्याची सगळी कौशल्ये त्यांच्यात स्वभावतःच असतात असा स्त्री
सामर्थ्याचा गौरव करून श्री मुनगंटीवार म्हणाले, फिक्की ने भारतात आयात होणाऱ्या वस्तूंकडे, त्याच्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे, यातील किती वस्तू आपण आपल्या भारतात तयार करू शकतो याचा
अभ्यास त्यांनी करावा आणि त्या भारतात तयार करण्याचा प्रयत्न करावा. भारताचा
सन्मान वाढवण्यासाठी टाकलेले प्रत्येक पाऊल आपल्याला भारत माता की जय च्या खऱ्या
संकल्पनेकडे नेणार आहे असेही ते म्हणाले.
००००



No comments:
Post a Comment