पंतप्रधान नरेंद्र मोदी एमएसएमई यांचेशी
साधणार थेट संवाद
* सुरेश भट सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन
* सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना ऋण आवेदनाची ऑनलाईन सुविधा
* राष्ट्रीय उपक्रमातील 80 जिल्ह्यात नागपूरचा समावेश
* नागपूर मध्ये अन्न प्रक्रिया युनीटला चालना
* 100 दिवसांच्या मिशनमध्ये लघु उद्योगांच्या उन्नती व रोजगारावर
भर
नागपूर, दि 01 : सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना
देण्यासोबत रोजगार निर्मितीचे दालन खुले व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या
वतीने 100 दिवसीय राष्ट्रस्तरीय ‘पीएसबी लोन इन 59 मिनीट’ या ऑनलाईन पोर्टलची
सुरुवात करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवार, दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता रेशिमबाग येथील
सुरेश भट सभागृहात नागपूर अन्न प्रक्रिया युनिटच्या ऑनलाईन पोर्टलचे लोकार्पण
करण्यात येईल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लघु उद्योजकांशी थेट संवाद
साधतील, अशी माहिती केंद्रीय
पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त सचिव श्रीमती वेन्नेलागंटी राधा यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आज ‘पीएसबी लोन इन 59
मिनीट’ उपक्रमाच्या लोकार्पण समारोहाची पूर्व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी,
महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय यादव, एमएआयडीसी चे विभागीय व्यवस्थापक डॉ. अनिल मोरे, महाराष्ट्र
प्रदुषण नियंत्रण मंडळाचे आनंद काटोले, सीए मिलींद कहाडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक
शरद बारापात्रे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शरद कोलते. अन्न सुरक्षा
अधिकारी मनोज तिवारी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सुनील सुर्वे यांच्यासह
संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र
शासनाच्या वतीने सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास कार्यक्रमांतर्गत अशा
उद्योजकांसाठी ‘पीएसबी लोन इन 59 मिनीट’
उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. दिनांक 2 नोव्हेंबरपासून 100 दिवसांकरिता
सुरु करण्यात येणाऱ्या या पोर्टल द्वारे सुक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योजकांना या
पोर्टलद्वारे ऋण आवेदन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
ज्यामध्ये 10 लक्ष रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतच्या ऋण आवेदनाचा समावेश राहणार आहे. आवेदकाला आधार
कार्ड, इन्कम टैक्स रिटर्न, जीएसटी रिटर्न्स,सीएमए डाटा, बॅलेंस शीट आदी कागदपत्रे
या पोर्टलशी जोडावी लागतील. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे ‘in-principle’ द्वारे
पात्र लाभार्थ्यांस मात्र 59 मिनीटात स्वीकृती पत्र या पोर्टलच्या माध्यमातून
उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती प्रभारी अधिकारी श्रीमती वेन्नेलागंटी राधा
यांनी दिली.
एमएसएमईच्या
उद्योजकांना घर बसल्या सुविधा मिळावी तसेच त्यांचे कर्ज प्रकरणे तात्काळ निकाली
लागून उद्योग वाढीस चालना मिळण्याबरोबर रोजगार निर्मिती करता यावी, या उद्देशाने ‘पीएसबी लोन इन 59 मिनीट’ या पोर्टलचा शुभारंभ
करण्यात येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शासनापर्यंत सुक्ष्म, लघु व मध्यम
उद्योगांच्या प्रगतीचा अहवाल देखील उपलब्ध राहणार आहे.
मान्यवरांच्या
उपस्थितीत शुभारंभ
केंद्र शासनाच्या
वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘पीएसबी लोन इन 59 मिनीट’ या पोर्टलचे एकाच दिवशी अर्थात दिनांक 2
नोव्हेंबर रोजी 80 जिल्ह्यात लोकार्पण करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र
राज्यातील नागपूर जिल्ह्याची अन्न प्रक्रिया युनिटमध्ये कार्यरत सुक्ष्म, लघु व
मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
नागपूर
येथे शुक्रवार, दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता रेशिम बाग येथील सुरेश भट
सभागृह येथे ‘पीएसबी लोन इन 59 मिनीट’ पोर्टलचे लोकार्पण
करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास (स्वतंत्र प्रभार)
राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय पाणीपुरवठा
व घनकचरा व्यवस्थापन संयुक्त सचिव तसेच नागपूरच्या प्रभारी अधिकारी श्रीमती
वेन्नेलागंटी राधा, बॅंक ऑफ इंडियाचे कार्यपालक निदेशक अतनु दास, महाप्रबंधक
अंसारी, अमित रॉय, स्वरुप दासगुप्ता, झोनल व्यवस्थापक विलास पराते आदी उपस्थित
राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट साधणार संवाद
केंद्र शासनाच्या ‘पीएसबी लोन इन 59 मिनीट’ पोर्टलचे लोकार्पण नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी
3.45 वाजता करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण रेशीमबाग येथील सुरेश
भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात येईल. ज्यामध्ये दुपारी 4 वाजता पंतप्रधान
नरेंद्र मोदी ‘पीएसबी लोन इन 59 मिनीट’
पोर्टलविषयी माहिती देणार आहेत. याचेही थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी उपस्थित
मान्यवरांसह उद्योजक तसेच नागरिकांना लाभणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
यांनी सांगितले. तत्पूर्वी बॅंक, टीआरईडीएस व जेम चे प्रतिनिधी पोर्टलची विस्तृत व
तांत्रिक माहिती सादर करतील.
*****
No comments:
Post a Comment