Thursday, 1 November 2018

धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान - राज्य निवडणूक आयुक्त


मुंबई, दि. 1 (रानिआ) : धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होईल; तर  मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे.  शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे.  एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत.  अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.
            अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
            दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रम
          नामनिर्देशनपत्रे दाखल करणे                    : 13 ते 20 नोव्हेंबर 2018
          नामनिर्देशनपत्रांची छाननी                        : 22 नोव्हेंबर 2018
          उमेदवारी मागे घेणे                                  : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत
          निवडणूक‍ चिन्ह वाटप                             : 27 नोव्हेंबर 2018
          मतदान                                                  : 9 डिसेंबर 2018
          मतमोजणी                                             : 10 डिसेंबर 2018
          निकालाची राजपत्रात प्रसिद्धी                    : 13 डिसेंबर 2018 पर्यंत
००००
 (Jagdish More, PRO, SEC)

No comments:

Post a Comment