मुंबई, दि. 28 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनसारख्या गॅझेट्सचा वाढता वापर हा त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करणारा आहे. यावर उपाययोजना म्हणून शाळांमध्ये आठवड्यातून एक दिवस ‘नो गॅझेट डे’ पाळण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे गुण अनिवार्य करण्याबाबत सदस्य कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. श्री. तावडे पुढे म्हणाले, गॅझेट्सच्या अतिवापराने मुलांच्या शारीरिक क्षमतांवर तसेच बौद्धिक क्षमतांवरही दुष्परिणाम होत आहे. शाळांनी मुलांना विविध प्रकारच्या खेळांमध्ये गुंतविल्यास ते इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर होतील. त्यादृष्टीने राज्य शासनाने गेल्या तीन वर्षात काही महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतीम परीक्षेत अतिरिक्त 10 गुण, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये 5 टक्के राखीव जागा, शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासिकांमध्ये वाढ आदी महत्त्वपूर्ण निर्णयांचा त्यात समावेश आहे. शिक्षण संस्थांनीही आपल्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपाययोजना करण्याची गरज आहे.
या चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या एका मुद्दयाला उत्तर देताना त्यांनी माहिती दिली, संस्कृत भाषेचे जतन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी संस्कृत भाषेतून कला शाखेची पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यात येतील.
या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य ॲड. पराग अळवणी, हर्षवर्धन सपकाळ, राम कदम, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment