Friday 30 November 2018

विधानपरिषद प्रश्नोत्तरे- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी दूर करण्यात येतील - दीपक केसरकर

मुंबई, दि. ३० : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी  दूर करण्यात येतील. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य डॅा. सुधीर तांबे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. यास उत्तर देताना श्री. केसरकर बोलत होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचारी व अधिकारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र, परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना ही २७ ऑगस्ट २०१४ पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन निधी  विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या १० जानेवारी २०१८ च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतून अंशतः पैसे काढण्याची सुविधा अपवादात्मक परिस्थितीत उपलब्ध आहे. सभासदाच्या संपूर्ण सेवा कालावधीत तीन वेळा जमा रकमेच्या २५ टक्के मर्यादेत (कर्मचाऱ्याच्या जमा अंशदान लाभासह) रक्कम काढण्याची तरतूद असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.
       यावेळी झालेल्या चर्चेत श्रीमती मनीषा कायंदे, सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, कपील पाटील, नागो गाणार, दत्तात्रय सावंत, किरण पावसकर यांनी सहभाग घेतला.
                                                                             ०००

No comments:

Post a Comment