Sunday, 2 December 2018

खेळामुळे मनावरील ताण कमी होतो - चंद्रशेखर बावनकुळे



नागपूर दि. 2  : शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात मनावरील ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय हॅडबॉल व सॉफ्ट बॉल स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री बावनकुळे यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
नागपूर जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु सिध्दार्थविनायक काणे, जिल्हाक्रीडा अधिकारी अविनाश पुंड, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्रदीप तळवलकर, जिल्हा क्रीडा हँडबॉल संघटनेचे कार्याध्यक्ष बिपीन कासगार आदी यावेळी उपस्थित होते.
दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रत्येक दिव्यांग खेळाडूचा समावेश शासकीय नोकरीत करण्यात येईल यासाठी संपूर्ण मदत करण्यात येईल असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. नागपुरातील क्रीडा मैदानाला शासनाच्यावतीने 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून लवकरच नागपुर शहरातील क्रीडा मैदानाला नवे स्वरुप प्राप्त होईल असेही ते यावेळी म्हणाले.
या क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी नागपुरातील ज्या क्रीडा खेळाडूंनी भारताचे नावलौकिक केले त्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये जिमनेस्टिक स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी  केलेल्या स्पर्धकांपैकी आयुषी शरदचंद्र घोडेस्वार, मृण्मयी दिलीप वालदे, प्राची पारखी व हँडबॉल स्पर्धेतील पुनम कडव, सॉफ्टबॉल स्पर्धेतील उर्वशी अनिल सनेश्वर, समृध्दी श्याम पेसने
तर दिव्यांग खेडाळू मध्ये मृणाली पांडे (बुध्दीबळ) तेजल पुनाराम गवार या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले तसेच प्रशिक्षक पुरुषोत्तम व्दारव्हनकर यानांही सन्मानित करणात आले. कार्यक्रमाचे संचालन राम ठाकुर यांनी केले तर आभार पवन मेश्राम यांनी मानले.
                                                                  *****

No comments:

Post a Comment