Tuesday, 1 January 2019

कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार -पणन मंत्री सुभाष देशमुख


कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पणनमंत्री यांची घेतली भेट
मुंबई, दि. 1 : राज्यातील कांद्यांचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करुन कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
राज्यातील कांदा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात पणन मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेवून निवेदन दिले, यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 पणन मंत्री श्री. देशमुख म्हणाले, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शासन पाठीशी असून कांद्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. काही बाजारसमित्या शेतमालाचे दर उतरावेत म्हणून बाजार समित्या बंद ठेवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी जर बाजार समित्या बंद ठेवत असतील तर त्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या खळ्यावर नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च घेवू नये, असेही पणन मंत्री श्री. देशमुख यांनी बैठकीत सांगितले.
कांदा जिवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळून दोन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, मार्च 2018 पर्यंत सरसकट कर्जमाफी करुन येणाऱ्या हंगामासाठी शून्य टक्के व्याजदाराने सुलभ पिक कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, दुष्काळाबाबत तातडीने मदत शेतकऱ्यांना करावी. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 हा अनुदान जाहीर केलेला कालावधी रद्द करुन 1 नोव्हेंबर ते 31 मार्च 2019 पर्यंत कांद्यास अनुदान जाहीर करावे. उन्हाळी कांदा खरेदीसाठी शासनाने हस्तक्षेप करावा. या विषयांवर चर्चा करण्यात आली.
००००

No comments:

Post a Comment