नागपूर, दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने 9- रामटेक व 10-नागपूर या निर्वाचन क्षेत्राची 11 एप्रिल 2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदारांना मतदान करता यावे तसेच कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी कामगारांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.
सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू राहील. यांतर्गत येणाऱ्या कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स याचा समावेश राहील, असे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून निर्गमित झालेल्या दिनांक 15 मार्च 2019 च्या परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी तसेच व्यवस्थापनाने वरील सूचनांचे अनुपालन व काटेकारेपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश उद्योग विभागाने दिली आहेत. मतदाराला मतदान करण्याचा हक्क बजावता आला नाही व तो मतदानापासून वंचित राहिला व मतदाराने तशी तक्रार केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही कामगार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी तसेच व्यवस्थापनाने याबाबत नोंद घेण्याचे आवाहन,उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment