पहिल्या टप्प्यात एक
बिलीयन युएस डॉलर गुंतवणूक करणाऱ्या
कंपनीला सर्वोतोपरी
सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई, दि. 2 : चायना येथील नाईन ड्रॅगन पेपर्स या
कंपनीने राज्यात पेपर निर्मितीचा उद्योग उभारण्याचा घेतलेला निर्णय हा दोन्ही
देशातील औद्योगिक घडामोडींमधील मैलाचा दगड ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात एक बिलीयन
डॉलर गुंतवणूक करणाऱ्या या कंपनीच्या उभारणीसाठी राज्यशासन सर्वोतोपरी मदत करेल,
असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र औद्योगिक
विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनबलगन आणि नाईन ड्रॅगन पेपर्स या
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिंग छोंग ड्यू यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे
सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला
उद्योगमंत्री सुभाष देसाई,
उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, मुख्यमंत्र्याचे
प्रधान सचिव भूषण गगराणी, चायना कंपनीच्या अध्यक्ष श्रीमती
येन छोंग, उपाध्यक्ष केन ल्यू, उप मुख्य
कार्यकारी अधिकारी छेंग फेइ चांग उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे
म्हणाले, महाराष्ट्र हे देशात औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणारे राज्य आहे.
देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा पंधरा टक्के हिस्सा आहे. राज्यात गेल्या कित्येक
वर्षात कोणतीही मोठी औद्योगिक अडचण निर्माण झालेली नाही. मुबलक प्रमाणात कुशल
मनुष्यबळ उपलब्ध आहे. शासनातर्फे उद्योग सुलभ धोरण राबविले जात आहे त्यामुळे
राज्यात झालेल्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती तर होत आहेच शिवाय ही गुंतवणूक
उद्योजकांनाही फायदेशीर ठरत आहे.
आज झालेल्या सामंजस्य
करारानुसार येत्या दोन ते तीन वर्षात सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर प्रकल्प
सुरू होणार आहे. यातून सुमारे तीन हजार प्रत्यक्ष तर चारपट अप्रत्यक्ष रोजगार
निर्मिती होणार आहे.
००००
No comments:
Post a Comment