Saturday, 16 March 2019

समाजात जलसाक्षरता करणे ही काळाची गरज - जिल्हाधिकारी अश्विन मुदगल














नागपूर, दि16: सजीवसृष्टीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक असून, भावी पिढीसाठी स्वच्छ पाणी टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. सिंचन भवन येथे आयोजित लोकसहभागातून जलसमृद्धी’ या संकल्पनेनुसार जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आज बोलत होते.
यावेळी गोसीखुर्दचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, अधीक्षक अभियंता राजेश पवार, जयंत गवळी, श्री. गंटावार आणि प्रवीण महाजन, संजय वानखडे  उपस्थित होते.
 विदर्भ पाटबंधारे विभागाच्या वतीने जलजागृती सप्ताह गेल्या पाच वर्षांपासून साजरा करण्यात येत असून, या सप्ताहानिमित्त शहरी तसेच ग्रामीण भागात जलस्त्रोतांच्या स्वच्छतेवर काम करणे आवश्यक झाले आहे. नद्या, नाले, तलाव,माजी मालगुजारी तलाव, विहिरी, यासारख्या जलपरिसंस्थाची काळजी घेण्याचे आवाहन करुन नैसर्गिक जलस्त्रोतांमधील वाढती अस्वच्छता, दूषितपणा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू नये यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात पथनाट्ये, जनजागृती मेळावे, जल परिसंवाद, चर्चासत्रे घेणे ही आज गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.   
 राज्य शासन गेल्या पाच वर्षांपासून विविध योजनेच्या माध्यमांतून केंद्रीत आणि विकेंद्रीत जलसाठे निर्माण करुन ते जलसमृध्द करण्यावर भर देत आहे, नागपूर विभागाने जलसाठे निर्मिती व त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात मोठी भूमिका निभावली आहे. जिल्हाधिकारी यांनी पाणी बचतीवर जास्तीत जास्त भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून, जगात इतर देशांच्या तुलनेत आपल्याला जास्त काम करावे लागणार आहे. पाणी पिण्यायोग्य व वापरण्यायोग्य बनविण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रात मोठी प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. मात्र, हेच स्वच्छ आणि शुद्ध पाणी जलसाक्षरतेअभावी वाया जात आहे. त्यासाठी जनतेमध्ये जलजागृती होणे आवश्यक असून, पाणीगळती थांबविणे आणि पाण्याच्या योग्य वितरणावर भर देण्याची गरज आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून जलजागृतीविषयी जनतेमध्ये जाणीव निर्माण होईल, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले. जलजागृती सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान विदर्भातील वर्धा, वैनगंगा, बाघ, वेण्णा, कन्हान इत्यादी प्रमुख नद्यांसह सर्व नद्यांचे जल एका कलशात एकत्र करण्यात आले. हा कलश जलजागृती सप्ताहादरम्यान विभागात सर्वत्र फिरविण्यात येणार आहे. यावेळी विभागाचे सचिव अविनाश सुर्वे यांच्या सीडीचे विमोचन करण्यात आले. तसेच जलजागृतीसाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना श्रीरंग खरे यांनी जलप्रतिज्ञा दिली. 
 जलजागृती सप्ताहामध्ये भित्तीपत्रके, बॅनर, पॉम्प्लेट इत्यादींच्या माध्यमातून प्रसार करणे, पाणीबचतीकरिता प्रबोधन व मार्गदर्शन करणे, प्रत्येक लाभक्षेत्रात जलजागृती प्रभातफेरी, जलदिंडी, विविध स्पर्धा, चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच उपरोक्त कार्यक्रमात गावाचे लाभक्षेत्र, पाणी उपलब्धता सिंचनाच्या पद्धती, पिकांना लागणारे पाणी व त्याची बचत शेतकरी, तालुकास्तरीय लाभधारकांच्या सभा, जलहमी अंतर्गंत सेवाहमी व त्यांच्या अडीअडचणीच्या निरसनाकरिता मेळावे व पाणीबचतीसाठी प्रबोधन करण्यात येणार आहे.
 यावेळी गोसेखुर्द पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे यांचेही अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय खोंडे यांनी केले तर सुदीन ढवळे यांनी आभार मानले.
*****

No comments:

Post a Comment