Wednesday 15 May 2019

निर्यातक्षम फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या - कृषी आयुक्त


विभागीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक 
नागपूर दि. 15: पूर्व विदर्भात निर्यातक्षम फलोत्पादनाला मोठा वाव असून, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन निर्यातक्षम फलोत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिले. वनामती येथे आयोजित विभागीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. 
यावेळी फलोत्पादन संचालक प्र. ना. पोकळे, विस्तार व प्रशिक्षण संचालक व्ही. एन. घावटे, मृदा संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक डॉ. कैलास मोने, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले उपस्थित होते.
भाताच्या क्षेत्रात 10 ते 15 टक्के क्षेत्र हे फळबाग, भाजीपाला या पिकाखाली आणण्यासाठी व त्यासाठी प्रत्येक कृषी सहायकाला किमान 10 हेक्टर लक्ष्यांक देण्यात यावे. फलोत्पादन अंतर्गंत निर्यातक्षम उत्पादनाकरिता कृषी सहायकांनी 20 शेतकऱ्यांची सीट्रस नेट तसेच वेज नेटमध्ये नोंदणी करुन घ्यावी. ठिबक सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी निरंक क्षेत्र असलेल्या कृषी सहायकांना यापूर्वी त्यांच्याकडे असलेल्या क्षेत्राच्या अतिरिक्त 15 टक्के लक्ष्यांक देण्यात यावा आणि त्यामध्ये कापसाचे 5 किंवा 6 हेक्टर क्षेत्र हे ठिबक सिंचनाखली आणण्यात यावे, असेही श्री. दिवसे यांनी सांगितले.
त्यासाठी कृषी सहायकांनी नियमित शेतीशाळा घेत असताना फळपिके आणि भाजीपाला कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांचा प्रचार करुन रब्बी क्षेत्र वाढविणे, जैविक घटकांचा वापर वाढविणे, निंबोळी गोळा करणे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देणे, भाजीपाला, मसाला पिकांचे क्षेत्र वाढविणे या मोहिमा राबविण्याचे नियोजन करा. बांबू आणि रेशीम लागवडीसाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यात यावा, असेही कृषी आयुक्त सुहास दिवसे यावेळी म्हणाले.
विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी आभार मानले
   ****

No comments:

Post a Comment