Tuesday 14 May 2019

संवाद-सेतूद्वारे संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला वर्धा जिल्ह्यातील दुष्काळी गावच्या सरपंचाना दिलासा



मुंबई, दि. 14 : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे टँकरची व्यवस्था, विशेष दुरुस्तीमधून जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती अथवा नवीन पाईपलाईन करणे, आवश्यकता असल्यास जनावरांना चारा छावण्या, रोजगार हमी योजनेच्या कामे सुरु करणे आदी उपाययोजना तातडीने करुन दुष्काळी जनतेला दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील आष्टी व करंजा या दोन दुष्काळी तालुक्यासह आर्वी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांशी तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी ऑडिओ ब्रीजच्या अर्थात संवाद सेतूच्या माध्यमातून संवाद साधत दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच  सरपंचांनी यावेळी केलेल्या मागण्यांसह व्हॉट्सॲप क्रमांकवर येणाऱ्या मागण्यांवरही तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी मुख्यमंत्री यांनी आर्वी तालुक्यातील प्रविण वैद्य, लक्ष्मी तेलतुंबडे, सोनुताई बोरवाल, भागिरथी राठोड, कारंजा तालुक्यातील रामदास आसवले, ईश्वरी आत्राम, दिलीप हिंगणीकर, शंकर निंबुसे, आष्टी तालुक्यातील वनिता केवटे, कल्याणी सांगळे, रत्नमाला पाटील, प्रमोद कापसे यांच्यासह अन्य सरपंचांशी संवाद साधला.
वर्धा जिल्ह्यामध्ये पाण्याची चांगली परिस्थिती असली तरी पुढील काळातील पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रशासनाने विहीर अधिग्रहणाच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी. नवीन विंधन विहिरींसाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेने योग्य जागा सुचविल्यास तत्काळ पुढील कार्यवाही करावी.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या कामावर विशेष भर देण्यात यावा. विविध योजनांचे एकत्रिकरण करुन रोजगार हमी योजनेतून 28 कामे करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळ निवारणाची कामे करणे शक्य  झाले आहे.
यावेळी मुख्य सचिव अजोय  मेहता, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.
वर्धा  जिल्ह्यातील टंचाईनिवारण कामकाज :
·         वर्धा जिल्हयातील आष्टी आणि कारंजा या 2 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या दोन तालुक्यातील गावांची संख्या 258  इतकी आहे.  यापैकी आष्टी तालुक्यात 1 टँकर सुरू आहे. आर्वी तालुक्यातही दुष्काळसदृश्य परिस्थिती जाणवत आहे व आर्वी नगरपरिषदेमध्ये 1 व आर्वी ग्रामीणमध्ये 1 टँकर सुरू आहे.
·         जिल्हयात आज अखेर 63 विंधण विहिरी, 63 विशेष नळपाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती     57  विहिरींचे  अधिग्रहण  करण्यात आले आहे.
·         पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची 1 कोटी 56 लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली असून सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
·         आष्टी आणि कारंजा तालुक्यातील 38 हजार 129 शेतकऱ्यांना 10 कोटी 10 लाख रुपये इतके दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे.
·         जिल्हयातील एकूण 35 हजार 059  शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. आजअखेर 40 लाख 17 हजार रुपये इतकी रक्कम 648 इतक्या पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
·         प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत वर्धा जिल्हयातील 81 हजार 299 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 40 हजार शेतकऱ्यांना 7 कोटी 81 लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
·         महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची 1 हजार 614 कामे सुरू असून त्यावर 2 हजार 766 मजूर उपस्थित आहेत. 21 हजार 203 कामे शेल्फवर आहेत.
००००

No comments:

Post a Comment