Wednesday 7 August 2019

राज्यात दोन भारत राखीव बटालियन आणि एका राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना


राज्यात चंद्रपुरातील कोर्टी मोक्ता आणि अकोल्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे अनुक्रमे भारत राखीव बटालियन क्र.4 व ची तसेच जळगावातील हतनूर-वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बल क्र.19 ची निर्मिती करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यात यापूर्वी 3 ठिकाणी भारत राखीव बटालियन स्थापन करण्यात आली आहे. या बटालियनद्वारे कायदा सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यात मदत होत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दोन अतिरिक्त बटालियनची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र. 4 आणि अकोला जिल्ह्यातील मौजे शिसा उदेगाव व हिंगाणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्र. 5 ची स्थापना करण्यात येत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनुर-वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 स्थापन करण्यात येत आहे.
आजच्या बैठकीत उच्चस्तरीय सचिव समितीच्या शिफारसीनुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक बटालियनसाठी आवश्यक असलेल्या 1384 पदांच्या एक तृतीयांश म्हणजेच 460 अशी तीन बटालियनसाठी एकूण 1380 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. उर्वरित पदे भारत राखीव बटालियन व राज्य राखीव पोलीस गट प्रत्यक्षात सुरु झाल्यानंतर उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात येणार आहेत. बैठकीत यासाठीच्या अपेक्षित 220 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
-----0-----

No comments:

Post a Comment