Wednesday 7 August 2019

गडचिरोली येथील केंद्रीय विद्यालयास सव्वा तीन हेक्टर जमीन देण्याचा निर्णय


गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव येथे स्थापन करण्यात येत असलेल्या केंद्रीय विद्यालयासाठी ३.२० हेक्टर जमीन नाममात्र भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या विद्यालयामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
गडचिरोलीसारख्या जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी उत्कृष्ट शालेय शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या सहाय्याने प्रायोगिक व नवकल्पनांचा प्रसार करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीयत्वाची भावना रूजविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. या विद्यालयासाठी मौजा नवेगाव येथील सर्वे क्रमांक ३२९ आराजी ३१.८० हेक्टर पैकी ३.२० हेक्टर शासकीय जमीन एक रूपये नाममात्र भाडेपट्ट्यावर ३० वर्षांसाठी देण्याचा आज निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ३८ व ४० अन्वये ही जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय विद्यालय संगठन यांना मंजूर करण्यात आलेल्या या जमिनीचा भाडेपट्टा वेळोवेळी नूतनीकरणास पात्र राहणार आहे.
-----०-----

No comments:

Post a Comment