नागपूर, दि. 18: जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कक्षाला आज निवडणूक खर्च निरीक्षक प्रतिक कुमार यांनी भेट दिली. यावेळी नोडल अधिकारी अनिल गडेकर यांनी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती दिली.
यावेळी नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल, सहाय्यक निवडणूक निरीक्षक शशिकांत लोटे, प्रशांत वावगे, जिल्हा परिषदेचे श्री.भोपळे उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निरीक्षक प्रतिक कुमार यांनी पेड न्यूज, सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींबाबतही आढावा घेतला. स्थानिक वृत्तवाहिन्यांवर येणारे वृत्तांवरील सनियंत्रणाबाबत माहिती जाणून घेतली. व्हॉट्स ॲप, फेसबूक पेज, ट्वीटर आदी सोशल माध्यमांवर करण्यात येणारी प्रसिद्धी, प्रचार आणि प्रसाराच्या नियंत्रणाबाबत नोडल अधिकारी अनिल गडेकर यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होत्या.
माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीकडून जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणारा मजकूर समिती सदस्यांकडून तत्काळ प्रमाणीत करून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यावेळी एमसीएमसी सदस्यांकडून उमेदवारांच्या प्रचार साहित्याचे करुन देण्यात आलेल्या प्रमाणीकरणाचा आढावा निरीक्षकांनी घेतला.
******
No comments:
Post a Comment