Monday 21 October 2019

नागपूर शहरात सर्वत्र उत्साहात मतदान


·         तीन पिढ्यांचे एकत्रित मतदान
·         सखी मतदान केंद्रावर सखींचे उत्साहात स्वागत
·        नवमतदारांमध्ये मतदानाचा विशेष उत्साह
नागपूरदि. 21: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी नागपूर शहरात सर्वत्र उत्साहात मतदान करण्यात आले. मतदान करण्यामध्ये वयोवृद्ध, दिव्यांग यांचा विशेष सहभाग होता. तसेच प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांमध्ये मतदान करण्याचा विशेष उत्साह जाणवला. दिवसभर शहरामध्ये  सर्वच मतदान केंद्रांमध्ये उत्साहात मतदान पार पडले.
तीन पिढ्यांचे एकत्रित मतदान
अजनी येथील माऊंट कार्मेल शाळेतील आदर्श मतदान केंद्र 52/144 येथे आज कुरमी कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी एकत्रित मतदान केले. यामध्ये आई श्रीमती फुलवती कुरमी (वय 80 वर्षे), अंध मुलगा रघुवीर कुरमी (वय 56 वर्षे) तसेच नातू आशुतोष कुरमी (वय वर्षे 23) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
तसेच मोतीबाग येथील स्वस्तिक माध्यमिक विद्यालय येथे देखील आई श्रीमती देवकाबाई श्रीवास (वय वर्षे 95), मुलगी श्रीमती नर्मदा श्रीवास (वय वर्षे 65), नातू मनोज श्रीवास (वय वर्षे 44), नातसून श्रीमती गायत्री श्रीवास (वय वर्षे 32) या तीन पिढ्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
सखी मतदान केंद्रावर सखींचे उत्साहात स्वागत
प्रताप नगर येथील प्रताप नगर शिक्षण संस्थेच्या ‘सखी मतदान केंद्रा’वर केंद्राध्यक्ष श्रीमती सोनाली पवार यांनी महिलांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. दक्षिण-पश्चिम मधील या सखी मतदान केंद्रामुळे  महिलांमध्ये मतदानासाठी विशेष उत्साह जाणवला.
नवमतदारांमध्ये मतदानाचा विशेष उत्साह
सोनेगाव येथील प्रियदर्शनी शिक्षण महाविद्यालयातील मतदान केंद्रावर पूर्वा देशपांडे, शिवानी जोशी, वैभवी जोशी तसेच वैभव जोशी यांना अठरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाचे एक मत देखील महत्वपूर्ण असल्याचा कौल या नवमतदारांनी दिला.
सोनेगाव येथील प्रियदर्शनी महाविद्यालयातील शिक्षिका श्रीमती शुभांगी भोयर या स्वत: दिव्यांग असून देखील त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवाय मतदानासाठी आईला देखील मतदान केंद्रावर आणून त्यांची  मदत केली. येथेच सुनील वसू (वय वर्षे 49) यांनी देखील व्हील चेअरवर येवून मतदानाचा हक्क बजावला. 
आझाद कॉलनी, ताजबाग येथील मलिक उर्दू हायस्कुल येथे मुस्लीम बंधू-भगिनींनी  उत्साहात मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी श्रीमती रेहाना परवीन, श्रीमती शाहीस्ता अंजुम, श्रीमती सलमा कुरेशी, श्रीमती नासिरा परवीन तसेच श्रीमती यास्मीन अख्तर यांनी  मतदानाचा हक्क बजावला आणि  आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले, असे त्यांनी सांगितले.
चिबली ले-आऊट येथील माधवी उच्च प्राथमिक शाळेत दीक्षा घेतलेले महानुभाव पंथी यदुराज बेलसरे (वय वर्षे 73), श्रीमती सुमन बेलसरे (वय वर्षे 70) तसेच श्रीमती सुमित्रा राखोंडे (वय वर्षे 80) यांनी मतदानाचा हक्क बजावला. महानुभाव पंथी यदुराज बेलसरे म्हणाले, आम्ही संसारातून जरी संन्यास घेतला तरी मतदान हे आमचे मुख्य कर्तव्य समजून पार पाडले.
*******

No comments:

Post a Comment