Tuesday 26 November 2019

संविधानाने दिलेल्या हक्कासोबत आपल्या कर्तव्याप्रती जागृती आवश्यक - डॉ.सिद्धार्थ गायकवाड



* संविधान दिनानिमित्त नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरूकता मोहिमेचा शुभारंभ

नागपूर, दि. 26 : भारतीय संविधानाने सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. संविधानाने दिलेल्या हक्कासोबतच आपल्या कर्तव्यासंबंधी जागृत राहावे, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), समाज कल्याण विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या दादासाहेब कुंभारे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे संचालक धनंजय वंजारी , डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे संचालक सुधीर फुलझेले, प्राचार्य आर. व्ही. पाटील, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक संचालक रमेश कुंभारे, संशोधन अधिकारी अविनाश रामटेके, लेखाधिकारी श्रीमती अर्चना सोळंके आदी उपस्थित होते.
भारतीय संविधानाबाबत जागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यादृष्टीने संविधान दिन साजरा करण्यात येतो. नागरिकांच्या भारतीय संविधानात नमूद मूलभूत कर्तव्याविषयी जागरुकतेसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे पुढील वर्षभर मोहीम राबविण्यात येणार आहे. उद्देशिका हा संविधानाचा आरसा असल्याचे सांगतांना प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड म्हणाले, जगासाठी आदर्श ठरलेल्या भारतीय संविधानाने  देशाला समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार बहाल केला आहे. संविधानामुळे प्रत्येकाला खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. या संविधानाचे रक्षण आणि सन्मान करण्याचे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. देशाला विद्यार्थी दशेपासूनच संविधानाचे संस्कार रुजविण्यासाठी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. घटनेने भारतीय नागरिकाला अकरा मूलभूत अधिकार  दिले आहेत. त्यामध्ये शिक्षणाचा अधिकाराचा समावेश ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संविधान हे परिवर्तनाचे साधन असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या विकासासोबतच प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकांना कलम 32 नुसार घटनेने दिले आहे. समता, स्वातंत्र व बंधुता हे संविधानाच्या माध्यमातून दिल्यामुळे जगामध्ये भारतीय लोकशाहीची समृद्ध परंपरा आजही कायम आहे. संविधानाप्रती सर्वांनीच आदर राखून त्यानुसार कृतीत आणण्याच्या दृष्टीने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे संचालक धनंजय वंजारी यांनी  यावेळी सांगितले.
 यावेळी संचालक सुधीर फुलझेले, प्राचार्य आर. व्ही. पाटील, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक संचालक रमेश कुंभारे, संशोधन अधिकारी अविनाश रामटेके तसेच विधी अधिकारी सारीका बोरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी उपास वाघमारे सूत्रसंचालन बादल श्रीरामे तर आभार सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी मानले.                                                                   
                                                            *****

No comments:

Post a Comment