Tuesday 28 January 2020

नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी 1146 कोटी वार्षिक आराखड्यास मान्यता


                               विभागाच्या 260 कोटी वाढीव निधीस मंजुरी

नागपूर, दि. 28: जिल्हा वार्षिक‍ योजनेच्या नागपूर विभागाच्या  आगामी आर्थिक (2020-21)  सर्वसाधारण प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्‍यात आली. विभागाच्या आराखड्यानुसार आर्थिक मर्यादेपेक्षा 259 कोटी 99 लाख रुपयांच्या वाढीव निधीस मंजुरी देण्यात आली. विभागाचा 1145 कोटी 77 लाख रुपयांचा वार्षिक आराखडा मान्य करण्यात आला.
 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर‍ विभागाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गोंदियाचे पालकमंत्री तथा गृहमंत्री अनिल देशमुख, नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, गडचिरोलीचे पालकमंत्री तथा  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वर्धाचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, चंद्रपूरचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, भंडाराचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार तसचे संबधित जिल्ह्याचे खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
  नागपूर विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी 885 कोटी 78 लाख रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हानिहाय आढावा घेऊन जिल्ह्यातील विविध योजना तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेताना विभागासाठी 259 कोटी 99 लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आहे. गडचिरोली जिल्ह्याची 149 कोटी 64 लक्ष आर्थिक मर्यादा असून, यामध्ये 81 कोटी 36 लक्ष रुपयांची वाढ करण्यात आली. जिल्ह्यासाठी 231 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
 चंद्रपूर जिल्ह्याची 180 कोटी 95 लक्ष रुपयांची आर्थिक मर्यादा आहे. त्यात 42 कोटी 65 लक्ष रुपयांची वाढ करण्यात आली असून, 223 कोटी 60 लक्ष रुपयांच्या आराखडा मान्य करण्यात आला आहे. भंडारा जिल्हा आर्थिक मर्यादा 94 कोटी 18 लाख वाढीव निधी 23 कोटी 42 लाख एकूण आराखडा 117 कोटी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले. गोंदिया जिल्हा आर्थिक मर्यादा 108 कोटी 39 लाख रुपये असून, एकूण वाढ 27 कोटी 6 लाख  रुपये वार्षिक आराखडा 135 कोटी 45 लाख रुपये आहे. वर्धा जिल्हा आर्थिक मर्यादा 110 कोटी 76 लाख रुपये असून, एकूण वाढ 27 कोटी 84 लाख रुपये आहे. त्याचा एकूण आराखडा 138 कोटी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याचा 241 कोटी 86 लक्ष रुपये आर्थिक मर्यादेपेक्षा 57 कोटी 66 लक्ष रुपये वाढीव निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्ह्याचा 299 कोटी 52 लक्ष रुपयांच्या वार्षिक निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्वागत करुन नागपूर विभागाची माहिती दिली.

*****

No comments:

Post a Comment