Thursday, 2 January 2020

महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी नागपुरात आज कार्यशाळा



नागपूर, दि. 2 : महिला व बालकांसंदर्भात  होणारे सायबर गुन्हे व इतर अत्याचाऱाबाबत जागरुकता निर्माण करण्यासोबतच यासंदर्भात असलेल्या विविध प्रतिबंधक उपाययोजनांची  माहिती देण्यासाठी शासनाकडून सायबर सेफ वुमन’ ही मोहीम  राज्यभर राबविण्यात येत आहे. याअंतर्गत  माहिती व जनसंपर्क  महासंचालनालय आणि नागपूर पोलिसांच्या सायबर सेलच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) येथे विविध क्षेत्रातील  महिलांसाठी  विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सिव्हिल लाईन्स परिसरात  प्रेस क्लबच्या सभागृहात सकाळी 11 वाजता  या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.  उद्घाटनाच्या या कार्यक्रमास  विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी  रविंद्र  ठाकरे, ज्येष्ठ महिला पत्रकार श्रीमती सरिता कौशिक, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अलिकडे घडलेल्या महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापक प्रमाणात चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकांसंदर्भात होणाऱ्या सायबर गुन्हे व इतर स्वरुपाच्या अत्याचाराबाबत जागरुकता  निर्माण करणे आवश्यक आहे. शासनाने यादृष्टीने महिला वर्गांमध्ये सायबर सुरक्षितता व जनजागृती  निर्माण  करण्यासाठी  राज्यभरात विशेष उपक्रम हाती घेतला असून याअंतर्गत 3 जानेवारीला ‘सायबर सेफ वुमन’ ही मोहीम राबाविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून राज्यभरात सर्वत्र  कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. नागपूर येथे होत असलेली कार्यशाळा या उपक्रमाचा  भाग आहे.
उद्घाटनानंतर आयोजित विशेष चर्चासत्रात सायबर माध्यमातून होणाऱ्या त्रासाबाबत कायद्याचे संरक्षण या विषयावर  पोलीस उपायुक्त आणि सायबर सेलच्या प्रमुख श्रीमती श्वेता खेडकर, सायबर सुरक्षिततेबाबत सायबर तज्ज्ञ राकेश माखिजा, महिलांच्या कायदेविषयक प्रश्नांबाबत ॲड. स्मिता सिंगलकर, ॲड. अंजली विटणकर, माध्यमांच्या भूमिकेबाबत ज्येष्ठ महिला पत्रकार श्रीमती सरिता कौशिक  मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित महिलांच्या विविध प्रश्नांचे  मान्यवरांकडून निराकरण करण्यात येईल. या कार्यशाळेत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, माध्यम क्षेत्रात कार्यरत महिलांसह इतर विविध क्षेत्रातील महिला कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. या उप्रक्रमात  महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभाग आणि नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
*****  

No comments:

Post a Comment