Sunday 23 February 2020

वाकी वार्षिक उर्सोत्सवात भाविकांना सोयी-सुविधा द्याव्यात - सुनिल केदार




        नागपूर दि.23 : सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे वाकी येथील धार्मिक स्थान श्री ताजुद्दीन बाबा दर्गा येथील वार्षिक उर्सोत्सवानिमित्त येणा-या भाविकांना सर्व सोयी-सुविधा देण्याचे निर्देश पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी आज दिले. 
            सावनेर तालुक्यातील श्री क्षेत्र वाकी येथ 77 वा वार्षिक उर्स येत्या 3 ते 9 मार्च 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. उर्सनिमित्त राज्यभरातील सर्व धर्मीय भाविक वाकी येथे येतात. येथे हिंदु आणि मुस्लीम या दोन्ही धर्मांचे धार्मिक विधी संपन्न होतात. उर्स काळात कीर्तन,भजन, गोपालकाला यासह कुराण पठाणही करण्यात येते. या कालावधीत भाविकांना पुरविण्यात येणा-या सोयी-सुविधांचा श्री. केदार यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री बाबा दर्गा वाकी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर डाहाके, सचिव ज्ञानेश्वर डाहाके, विश्वस्त मधुकर टेकाडे, सावनेर मंडळ अधिकारी होमेश्वर पवार, उप कार्यकारी अभियंता गजानन डाबळे आदी उपस्थित होते.
            श्री ताजुद्दीन बाबा दर्गा येथील वार्षिक‍ उर्ससाठी दरवर्षी राज्यभरातून 5 ते 6 लाख भाविक येतात. या भाविकांनी सर्व सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने समन्वय ठेवून काम करावे. आरोग्य विभागाने पाटणसावंगी येथील 108 नंबरची रुग्णवाहीका वाकी येथे सुसज्ज ठेवावी. उर्जा विभागाने पथ दिवे नादुरस्त असल्यास तात्काळ दुरुस्त करुन घ्यावेत. उर्स दरम्यान अखंडित वीज पुरवठा करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली. भाविकांना शुध्द पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, फिरते प्रसाधन गृह यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच या परिसरात  चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत श्री. केदार यांनी संबंधितांना निर्देश दिले.
            मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत  वाकी -डोहणघाट -वाकोडी या रस्त्याचे तसेच कवठा ते हत्तीसरा येथील डांबरी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना श्री. केदार यांनी सबंधितांना दिली. सिव्हील लाईन्स येथील ताजुद्दीन बाबा मिठा नीम दर्गा येथे भाविकांसाठी प्रसाद म्हणून मोठया प्रमाणावर रस्त्यावरच अन्न शिजविण्यात येते. यामुळे  वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.  या दृष्टीने वाहतूक  अन्न व औषधे प्रशासनाने लक्ष पुरवावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
ग्रामपंचायत रुई येथील जलकुंभाचे लोकार्पण
       मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत  ग्रामपंचायत रुई येथील 30 हजार लीटर क्षमता असणा-या जलकुंभाचे  लोकार्पण श्री. केदार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, रुई ग्रामपंचायतच्या सरपंच मंगला गाडबैल, उपसरपंच नम्रता भगत आदी मान्यवर उपस्थित होते. जलकुंभाच्या बांधकामाला 37 लाख रुपये निधी खर्च झाला असून यामुळे ग्रामपंचायत रुई येथील ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

******


No comments:

Post a Comment