Friday 27 March 2020

गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप -डॉ.नितीन राऊत


















* संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
* आंतरराज्य सीमेवर अडकलेल्या नागरिकांसाठी कॅम्प
* आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करणार
* उद्योजकांकडून 1 कोटी 10 लाखांची मदत
* गुरांसाठी चाऱ्यांची सुविधा उपलब्ध करणार

नागपूर, दि. 27 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील अत्यंत गरीब व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनातर्फे तांदूळ, पीठ, तेल, तिखट-मीठ, साखर आदी जीवनावश्यक वस्तू असलेल्या किटचे घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. नागरिकांनी  या संचारबंदीचे कटाक्षाने पालन  करावे.  असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना व संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना अत्यावश्यक साहित्याच्या पुरवठ्याबाबत आढावा डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात  घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सोलर उद्योग समूहाचे मनीष सत्यनारायण नोवाल, क्रेडाईचे सुनील दुद्दलवार, गौरव अग्रवाल, सोमेश्वर मुंदडा, राजा करवाडे, संतोष चावला आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तसेच शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे झोपडपट्टी तसेच इतर भागातील नागरिकांच्या दैनंदिन रोजगाराचा  प्रश्न निर्माण झाला आहे. शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु या गटात न मोडणाऱ्या गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप जिल्हा प्रशासनातर्फे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्यात येत आहे. त्यात पाच किलो तांदूळ, पाच किलो पीठ त्यासोबत मूगडाळ, मीठ, हळद, मिरची, साखर, चनाडाळ, पोहे, रवा, चहापत्ती, बेसन तसेच बटाटे व कांदे यांचे एकत्र पॅकेट करुन महसूल, पोलीस व महापालिकेच्या मदतीने वाटप करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.  
  संचारबंदीच्या काळात जिल्हाबंदी असल्यामुळे विविध क्षेत्रातील कामगार आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सीमेवर थांबलेले आहेत. अशा नागरिकांसाठी सीमेवर कॅम्प तयार करुन राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहतूकबंदी असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून चारा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्चासाठी प्रस्ताव
संचारबंदी असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यकता असेल तेथे भोजनासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक विकास निधीमधून मतदार संघात 25 लाख रुपये खर्च करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्य सचिव यांनी अनुकुलता दर्शविली असल्याचेही पालकमंत्री  डॉ. राऊत यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी एक कोटी
संचारबंदीच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घेतली असून जिल्ह्यातील गरजू नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. सोलर उद्योग समूहाचे मनीष सत्यानारायण नोवाल यांनी एक कोटी रुपयाचा धनादेश आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपूर्द केला. तसेच क्रेडाईतर्फे सुनील दुद्दलवार व गौरव अग्रवाल यांनी 10 लाखांचा धनादेश दिला. 
संचारबंदीच्या काळात गरीबांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली असून उद्योजक, स्वयंसेवी संस्था, संघटना व व्यक्तींनी आपली मदत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे देण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.
*****



No comments:

Post a Comment