Wednesday 27 May 2020

कोरोना नियंत्रणासाठी सहा हजारांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध

* विभागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे यशस्वी नियोजन
                                                           * दोन हजार  तज्ज्ञ डॉक्टर, अडीच हजार परिचारिकांचा समावेश
                                                            * प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी 
               नागपूरदि. 27 : कोरोना विषाणूच्या प्रभावी  व परिणामकारक  नियंत्रणासाठी  राष्ट्रीय व राज्यपातळीवर विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे.  कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेवून विभागातील 5 हजार 808  तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून सज्ज ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देशातच नव्हे तर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.
            कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात दहशत निर्माण झाल्यामुळे या विषाणूच्या नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूर विभागात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागपूरसह पाचही जिल्ह्यांचा भविष्यातील उद् भवनाऱ्या परिस्थितीचा तसेच लोकसंख्येचा अभ्यास करुन त्यानुसार सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे.
            कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणासाठी  विभागस्तरावर तयार करण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधांच्या आराखड्यानुसार 393 तज्ज्ञ डॉक्टर, 1 हजार 957 डॉक्टर, 2 हजार 488 परिचारिका व 970 वर्ग चारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. अशा प्रकारे प्रशिक्षण देवून तज्ज्ञ वैद्यकीय मनुष्यबळ केवळ विभागात उपलब्ध झाले आहे.
            कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरपासून स्वतंत्र कोविड एअर सुसज्ज रुग्णालय तयार करण्याचा समावेश आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, वर्ध्याच्या सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा अभ्यास करुन त्यानुसार राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर चालविण्यासह इतर आवश्यक प्रशिक्षण देवून तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आली आहे.
            जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आयसीयू व एचडीयू  सुविधांचा अभ्यास करुन त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करुन त्यानुसार प्रशिक्षण  5 हजार 808 वैद्यकीय अधिकारी व संलग्न कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात केवळ नागपूर विभागात राबविण्यात आल्यामुळे नागपूर शहर संपूर्ण विभाग कोरोनावर प्रभावी व परिणामकारक उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे. 
            वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना कोविडसंदर्भात प्रशिक्षण देण्याच्या नियोजनानुसार विभागात 288 विशेषज्ञ, 996  एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टर, 2 हजार 280 परिचारिका तसेच 996 वैद्यकीय सहाय्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.  परंतु प्रत्यक्षात यापेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. यासाठी  विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. नागपूर शहरात तसेच जिल्ह्यात 180 विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) 600 एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टर, 1 हजार 380  परिचारिका तसेच 600 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या  प्रशिक्षणामुळे  कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात तसेच राज्यात सर्वाधिक आहे.
            शासकीय आरोग्य संस्थांबरोबरच 16 खाजगी रुग्णालये, वेस्टर्न कोल फिल्ड, आयुर्वेदिक महाविद्यालय, महानगरपालिका व जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा तीनपट जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देवून अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तीन शिफ्टमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत.  कोविड रुग्णालयातील कर्मचारी सतत 15 दिवस कामावर असल्यामुळे त्यांना विश्रांती देवून त्यांच्या ऐवजी बदली कर्मचाऱ्यांच्या सेवांचा सुद्धा या प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे.
            कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विभागात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विविध विभागांचे प्रमुख तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद अधीक्षक, आरोग्य यंत्रणेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, महसूल आदी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाखाली विशेष कृती  गट तयार करुन सूक्ष्म नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा सज्ज ठेवल्यामुळे नागपूर विभाग हा राज्यात व देशात कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
****

No comments:

Post a Comment