Friday 22 May 2020

निसर्गाचे संवर्धन हाच मानवी समस्येवर उपाय - वनमंत्री संजय राठोड


       आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस

            नागपूर, दि. 22  : सर्व सजिवांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. मानवी जीवन सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असून, निसर्गाच्या कृपेमुळेच मानव आपले जीवन शाश्वत पध्दतीने जगत आहे. मानवी जीवनाच्या सुखाचे उगमस्थान निसर्ग असून मानवाला त्याचे जीवन शाश्वत पध्दतीने जगावयाचे असेल, तर निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण हा त्यावरील एकमेव उपाय असल्याचे मत  वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने वन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
           बैठकीच्या सुरुवातीला प्रधान मुख्य वन संरक्षक, वन बल प्रमुख सुरेश गैरोला यांनी आंतरराष्ट्रीय जैव  विविधता दिवसाचे महत्त्व विषद केले.सर्व सजिवांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने, संयुक्त राष्ट्रसंघाने 22 मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. संपूर्ण जगभरात जैवविविधतेच्या संवर्धनाच्या संबंधित संकल्पनेवर हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्थानिक स्तरावरील कार्यक्रमाशिवाय महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने वेबीनार चे आयोजन केले आहे. या वर्षी' ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस’ साजरा करण्यासाठी संकल्पना 'Our Solutions are in Nature' अशी आहे. 1 जानेवारी 2012 पासून शासनाने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे गठण केले असून नागपूर मुख्यालयातून मंडळाचे कामकाज सुरू झालेले आहे.
            महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन झालेल्या असून त्यांचेमार्फत स्थानिक क्षेत्रातील जैवविविधता संरक्षण व संवर्धनाचे काम अपेक्षित आहे. यासाठी लागणारी तांत्रिक मदत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर मार्फत देण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सावंतवाडी, पूर्व नाशिक, पुणे, यावल, भंडारा, गडचिरोली, वडसा व चंद्रपूर वन विभागातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे माध्यमातून गठीत करण्यात आलेल्या जैविक विविधता व्यवस्थापन समित्यांनी लोक सहभागातून तयार केलेल्या निवडक जैविक विविधता संवर्धन योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये आबोली, सिंधुदुर्ग येथील malbar gliding frog संवर्धन, हिरबाबाई अमरावती येथीत महासीर मत्स्य संवर्धन प्रकल्प, सिंधुदुर्ग येथील धाणेश संवर्धन यांचा समावेश आहे.
            वन विभागाने 'आलापल्ली-वन वैभव" म्हणून जतन केलेल्या वनक्षेत्रास जैविक विविधता वारसा क्षेत्र म्हणून घोषित करावे म्हणून मंडळाने शासनास प्रस्ताव सादर केला होता, त्या आधारे शासनाने अलिकडेच 'आलापल्ली-वन वैभव' ह्याची जैविक विविधता वारसा क्षेत्र म्हणून अधिघोषित केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मानवी जीवन सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असून, निसर्गाच्या कृपेमुळे मानव आपले जीवन शाश्वतपध्दतीने जगत आहे. मानवी जीवनाच्या सुखाचे उगमस्थान निसर्ग आहे. मानवाच्या प्राथमिक गरजांची पुर्तता करण्याचे माध्यम आहे. अशा परिस्थितीत मानवाला त्याचे जीवन शाश्वत पध्दतीने जगावयाचे असेल, तर निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण हा त्यावरील एकमेव उपाय असे राठोड म्हणाले.

0000

No comments:

Post a Comment