Friday 29 May 2020

शेतकऱ्यांकडे असलेली संपूर्ण कापूस खरेदी करणार - सुनील केदार





     
·        चिमणाझरी केंद्रावर कापूस खरेदी
·        मांडवा, बाजारगावसह येथेही कापूस खरेदी सुरु
·        जिल्ह्यात 16 लक्ष 756 क्विंटल कापसाची खरेदी

नागपूर, दि. 22 : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस जिल्ह्यातील 23 जिनिंग ॲन्ड प्रेसिंग येथे कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत खरेदी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडे असलेला संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येईल,अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.
चिमणाझरी येथी जिनिंग ॲन्ड प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी कापूस विक्रीसाठी आलेल्या पहिल्या पाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. यावेळी सीसीआयमार्फत 250 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील मांडवा, बाजारगाव येथेही कापूस खरेदी सुरु आहे.
जिल्ह्यातील 81 हजार 648 शेतकऱ्यांकडून 16 लाख 75 हजार 28 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कापूस पणन महासंघातर्फे 12 हजार 863 शेतकऱ्यांकडून 3 लाख 5 हजार 72.55 क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. तसेच सीसीआयमार्फत  2 हजार 114 शेतकऱ्यांकडून 83 हजार 643.93 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्यासोबतच खासगी बाजार पणन परवानाधारक तसेच बाजार समित्यांमध्ये अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांकडूनही कापसाची खरेदी करण्यात येत आहे.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, जिल्हा परिषद सदस्या वृंदा नागपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अहमद बाबू शेख,निर्मल समूहाचे प्रमोद मानमोडे आदी उपस्थित होते.
नागपूर तालुक्यातील चिमणाझरी येथील निर्मल जिनींग ॲन्ड प्रेसिंग सेंटर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसेच पशू संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत आज सीसीआयद्वारे ( कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) शेतकऱ्यांचा 250 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. मांडवा, बाजारगावप्रमाणेच चिमणाझरी येथे देखील  कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर अंतर्गत येणाऱ्या मांडवा आणि बाजारगांव येथे कापूस विक्रीसाठी ज्या शेतकऱ्यांनी टोकण प्रणालीद्वारे नोंदणी केली आहे, त्या शेतकऱ्यांचा कापूस निर्मल जिनिं ॲन्ड प्रेसिंग सेंटर येथे आजपासून मोजण्यात येत आहे. मान्सूनचे दिवस समोर आले आहे.  पेरणी करण्यासाठी बी-बियाणे खरेदी करायची आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी तात्काळत राहावे लागू नये, यासाठी मांडवा, बाजारगावप्रमाणेच चिमणाझरी येथे कापूस खरेदी करण्यात येत आहे.
 निर्मल जिनींग ॲन्ड प्रेसिंग सेंटरची खरेदी केलेल्या कापसाची साठवणूक क्षमता 8 हजार क्विंटल आहे. येथे आज शेतकऱ्यांच्या 9 गाडयातील 250 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. येथे कापूस विक्रीकरिता आलेल्या कोणत्याही  शेतकऱ्याला परत पाठविण्यात येणार नाही. प्रारंभी डॉ. नितीन राऊत आणि  सुनील केदार यांनी कापूस मोजणी यंत्राचे पूजन केले. त्यानंतर कापूस विक्रीकरिता आलेल्या शेतकऱ्यांपैकी मनोज पिसार (पांजरी), धमेंद्र गारघाटे (ब्राम्हणी), अरुण मांडवगडे (आलागोंदी), विष्णू मातनकर (रामा) आणि चिरकूट रोकडे (जामठा) या शेतकऱ्यांना प्रातिनिधि स्वरुपात शाल, श्रीफळ, गुलाबपुप्ष देवून डॉ. राऊत तसेच श्री. केदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
*****

No comments:

Post a Comment