Saturday 27 June 2020

औद्योगिक आस्थापनांनी कोरोनाबाबतचे निर्देशाचे कठोर पालन करावे - रविंद्र ठाकरे

नागपूर, दि. 27 : जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून सर्व औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांची तपासणी करण्यात येणार आहे. उद्योग आस्थापनांमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांच्या पालनाबाबत तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, निर्देशांचा भंग करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिलेत.  
  कोरोना विषाणूचे रुग्ण ग्रामीण भागातही आढळून येत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील   हिंगणा व बुटीबोरी  या दोन्ही औद्योगिक वसाहती ग्रामीण क्षेत्रात येतात. हिंगणा औद्योगिक वसाहतीमध्ये तीन उद्योगातील कामगारांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात येत आहे. 
शासनाच्या निर्देशित नियमावलीनुसार कामाच्या ठिकाणी मास्क किंवा फेस कव्हर घालणे, प्रवेशद्वार, सभेचे हॉल, मोकळी जागा, व्हरांडा, भिंती, यंत्रसामुग्री, लिफ्ट, वॉशरुम, टॉयलेट, जेवणाची जागेचे दररोज निर्जंतुकीकरण करणे, कामगारांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनिंग सुविधा ठेवणे, वारंवार हात धुण्याची व्यवस्था व सॅनिटायझरची सुविधा,  गैरहजर असणाऱ्या कामगाराचा तपशील ठेवणे, गैरहजर असल्यास त्या कारणाचा तपशील ठेवणे, सामाजिक अंतर ठेवणे, कामगारांच्या जेवणाच्या वेळा विभागून देणे, लिफ्टऐवजी पायरींचा वापर आणि तंबाखू -गुटखा वापरावर बंदी घालण्याचे निर्देश आहेत.
या विशेष मोहीमेअंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील 900 उद्योगांची तपासणी पूर्ण झाली असून,  त्यासाठी विविध विभागातील 90 अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती  केली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत. 
*****

No comments:

Post a Comment