Sunday 29 November 2020

कोविडग्रस्तांना शेवटच्या तासात करता येईल मतदान : जिल्हाधिकारी


मनपा क्षेत्रात आजच जाणून घ्या आपले कुठे आहे मतदान

झोनल ऑफिसमध्ये सोमवारीही कर्मचाऱ्यांची तैनाती

 

नागपूर, दि.29 :  मंगळवारी 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर मतदानाच्या दिवशी मतदारांचे नाव शोधण्यासाठी जाणारा वेळ लक्षात घेता मतदानाच्या उदया एक दिवस आधी देखील शहरात महानगरपालीकेच्यावतीने दहा झोननिहाय मतदान केंद्रावर संगणक व टॅबसहीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशीही हे सहाय सुरू असेल,असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

     प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही झोनमधील मतदान केंद्रावर हे कर्मचारी मतदाराला त्यांचे नाव व मतदान केंद्र  शोधण्यासाठी मदत करतील. तथापि,आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची एक दिवस आधीच माहिती करून घेण्याचे आवाहनही  जिल्हा प्रशासनाने केले आहे .

      ऐनवेळी जाणारा वेळ लक्षात घेता यासंदर्भात उपाय योजना प्रशासनाने केल्या असून यासाठी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या महानगरपालिकेच्या झोनल कार्यालयात कर्मचारी या कार्यासाठी विशेषतः तैनात करण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेमध्ये उद्या सोमवारी देखील हे कर्मचारी उपस्थित असतील.या ठिकाणी आपले नाव नेमके कोणत्या केंद्रावर आहे, याची माहिती मतदारांना मिळू शकते. सोबतच सोमवारी मतदान केंद्रावर सुरूवातीच्या काही तासांमध्ये हे कर्मचारी मदतीसाठी तैनात असतील.

  कोविड संसर्ग काळातील ही निवडणूक असल्यामुळे यासाठी  मतदारांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात आली आहे. या सोबतच कोविडसंसर्ग झालेल्या मतदाराला सुध्दा शेवटच्या तासात  म्हणजे 4 ते 5 या काळात मतदान करता  येणार आहे. सुरक्षीततेचे सगळी खबरदारी घेवून कोविडग्रस्तांना मतदान करता येईल.

    भारत निवडणूक आयोगाने  नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे.आता 322 केंद्रावर मतदान होणार आहे.

  कोवीड-19 संदर्भातील सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे. नव्या यादीनुसार आता नागपूर जिल्ह्यामध्ये 164, भंडारा जिल्ह्यांमध्ये 31, गोंदिया जिल्ह्यामध्ये 21, वर्धा जिल्ह्यामध्ये 35, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 50, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 21 असे एकूण 322 मतदान केंद्र असतील.

******


 

 

No comments:

Post a Comment