Tuesday 8 December 2020

 



दिव्यांग बालकांच्या जन्मापासूनच उपचाराला प्राधान्य

                                              -रविंद्र ठाकरे

दिव्यांगासाठी शिघ्र निदान व उपचार केंद्राची सुरुवात

        नागपूर, दि. 8 : मतिमंद अथवा दिव्यांग असलेल्या बालकांची विशेष काळजी घेताना त्यांच्या संगोपनासोबतच वैद्यकीय उपचारासाठी शिघ्र निदान व उपचार केंद्र पालकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. कुटुंबातील  दिव्यांग बालकाबाबत पालकांनी  अधिक जागृतपणे संगोपन करण्यासाठी या उपचार केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

            उत्तर अंबाझरी मार्गावरील दिव्यांगासाठी मुक आणि बधीर औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांसाठी शिघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

            यावेळी  जिल्हा समाज कल्याण अधीक्षक प्रवीण मेंढे, मुकबधीर औद्योगिक संस्थेच्या प्राचार्या डॉ. सौ. मीनल सांगोळे, वाचार उपचार तज्ज्ञ सौ. अरुणा आढाव आदी उपस्थित होते.

            दिव्यांग बालकांचे निदान व उपचार वेळीच केल्यास त्यांचे पुनर्वसन करणे सोयीचे असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी  रविंद्र ठाकरे म्हणाले की, दिव्यांग बालकांचे संगोपन ही मोठी  जबाबदारी असल्यामुळे पालकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करतानाच शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी शिघ्र निदान व  उपचार केंद्राची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. या केंद्रामार्फत अशा पालकांचे समुपदेशन करण्यासोबतच विविध सोयी व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रविंद्र ठाकरे यांनी केले.

            मुक आणि बधीर औद्योगिक संस्था, शंकरनगर या संस्थेमार्फत उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. सहा वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालकांचे निदान व दिव्यांगांचे प्रकार वेळीच निदर्शनास आणून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी ही संस्था पुढाकार घेणार आहे. या संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी विशेष सवलती सुद्धा उपलब्ध आहेत.

            प्रारंभी मुक आणि बधीर औद्योगिक संस्थेच्या प्राचार्या डॉ. सौ. मीनल सांगोळे यांनी स्वागत करुन केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सौ. अरुणा आढाव यांनी  उपचार केंद्राबद्दल पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेल्या पथनाट्याबद्दल माहिती दिली. यावेळी दिव्यांग संस्थेच्या सौ. वर्षा साठवणे, श्रीमती मीनाक्षी गुंडेवार, राजेंद्र आढाव तसेच  शिक्षक-पालक आदी उपस्थित होते.

*****

No comments:

Post a Comment