Sunday 21 February 2021

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन सज्ज -जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे नियमांचे पालन न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई नागपूर, दि. 21 : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता आगामी काळात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जनतेला आज येथे आहे. गेल्या पाच दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या अचानक वाढत असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. शाळा आणि महाविद्यालये नुकतीच सुरु करण्यात आली होती. मात्र, शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे पुढील 10 दिवसांसाठी ते बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या शाळा-महाविद्यालयांचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. तसेच संबंधित तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती द्यावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या तात्काळ आरटीपीसीआर चाचण्या करुन घ्याव्यात. शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर थर्मल गनने विद्यार्थ्यांचे तापमान मोजावे. तसेच कोविडची लक्षणे आढळल्यास त्याची तात्काळ चाचणी करुन घेण्याचे आणि त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधित शिक्षक-विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विविध मार्गदर्शक सूचना, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा व इतर सर्च प्रकारच्या व्यक्तींच्या एकत्रित येताना कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे श्री. ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना तालुका स्तरावर तहसीलदारांनी आवश्यक तपासणी, धाडी, दंड आकारणी व दंड वसुली ही कामे तालुका दंडाधिकारी यांच्या नियंत्रणात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लग्नसमारंभासाठी 50 व्यक्तींची अट कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 व्यक्तींच्या मर्यादेत कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रमादरम्यान सामाजिक अंतराचे पालन करुन खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, समारंभासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनस्थळी 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त संख्या असू नये. त्यापेक्षा जास्त असल्यास आणि कोविड नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास आयोजक आणि मंगल कार्यालय, दुकान मालकांवर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी घेणार आढावा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे हे उद्या, सोमवारी नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर आणि नागपूर ग्रामीण तालुक्यांना भेटी देणार असून तेथे कोविड-19 संबंधी आढावा बैठका घेणार आहेत. या बैठकांना नगर परिषदेचे अध्यक्ष, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पथक, नियंत्रण कक्ष आणि तपासणी पथकातील सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी सकाळी 9.30 वाजता नरखेड पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेणार असून या बैठकीमध्ये सहवासितांच्या शोध मोहिमेचे नियोजन, तपासणी संख्या वाढविण्याचे नियोजन, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणे, सुपर स्प्रेडर तपासणी सद्य:स्थिती आणि मृत्यूचे अन्वेषण आदी विषयावर आढावा बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर काटोल येथे 11 वाजता, कळमेश्वर दुपारी 1 वाजता, सावनेर दुपारी 3 वाजता आणि नागपूर ग्रामीण सायंकाळी 5 वाजता अशा आढावा बैठका घेणार आहेत.या बैठकांना पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ******

No comments:

Post a Comment