Monday 22 February 2021

गारपीटग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा -पालकमंत्री डॉ.नितीन राऊत नागपूर, दि 22: कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची, गहू, चना, धान व ज्वारी या पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. कुही तालुक्यातील वडेगाव या नुकसानग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. आमदार राजू पारवे, जि.प. सदस्य मनीषा फेंडर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार बी. एन. तिनघसे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे, महावितरण उमरेडचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोड, उपकार्यकारी अभियंता भुपेश रंधये आदी उपस्थित होते. 2013, 2014 तसेच आता 2021 मध्ये पुन्हा निसर्गाने धोका दिला. त्यामुळे हाती आलेले मिरची, चना व धान पिक गेले, असे वडगाव येथील शेतकरी श्री. लुटे यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले. कुही तालुक्यातील वडेगाव, पचखेडी, परसोडी, नवेगाव, मदनापूर, माजरी, मांढळ, भांडारबोडी, सोनगाव, रेंगातूर व बोरीसदाचार या नुकसानग्रस्त गावांचा समावेश आहे. या गावातील 701 शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील एकूण क्षेत्राच्या 33 टक्के म्हणजेच 304.11 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. कुही तालुक्यात ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधीत 22 हजार सात शेतकऱ्यांना 19 कोटी 77 लाख 14 हजार 636 रुपयांचे बँकेमार्फत अनुदान वितरीत करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली . पालकमंत्री श्री. राऊत यांच्या हस्ते कुही पंचायत समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात व्हीलचेअर, ट्रायसिकल वितरण करण्यात आले. 00000

No comments:

Post a Comment