Tuesday 16 February 2021

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा
* शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रस्ता सुरक्षा अभियान * अपघातमुक्त सेवा दिलेल्या वाहनचालकांचा गौरव नागपूर, दि. 16 : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतुकींच्या नियमांचे पालन करतानाच वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणारी जीवितहानी टळू शकते. त्यामुळे जनतेने वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवासकर यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा व घ्यावयाची काळजी यासंदर्भात विशेष रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. नेवासकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी हीरो मोटरचे वितरक प्रकाश जैन, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे, श्री. सोलंकी, श्रीमती राधा, कार्यक्रमाच्या संयोजक श्रीमती राजश्री वानखेडे तसेच मान्यवर उपस्थित होते. रस्त्यावरील वाहनांची संख्या सातत्याने वाढत असून वाहनचालकांकडून वाहतूक नियमासंदर्भात आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे रस्त्यावरील अपघाताच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे सांगताना श्री. नेवासकर म्हणाले की, दुचाकी वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढत असून अपघात टाळण्यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक आहे. शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांची माहिती सुलभपणे जनतेपर्यंत पोहचत आहे.या अभियानात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचाऱ्यांची जनआक्रोश ही संस्था नागपूरमध्ये कार्यरत आहे. नागपूरातील 70 टक्के ब्लॉक स्पॉट कमी केले आहे. गाडी ही आपली सोबती आहे अशी भावना नागरिकांनी ठेवून तिची काळजी घेणे आवश्यक आहे तरच अपघात कमी करण्यास मदत होईल, असे श्री. नेवासकर यांनी सांगितले. जागातील एक मोठी वाहन निर्मिती कंपनी म्हणून हिरो कपंनीकडे पाहिले जाते, या कंपनीचे 10 कोटी टू-व्हिलर्स उत्पादित केली आहेत. शासकीय यंत्रणेसोबत खाजगी संस्थांचा सहभाग घेऊन रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम राबविल्यास या अभियानास गती येऊन अपघात कमी करण्यास मदत होईल, असे प्रकाश जैन यांनी सांगितले. युनोने शून्य अपघाताचे प्रमाण करण्याचे ठरविले असून यामुळे त्यांच्या अभियानास मदत होईल. रस्त्यावर पार्किंगमुळे रस्ते लहान झालेले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताचे प्रमाण वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. जनतेमध्ये अपघाताविषयक विस्तृत जनजागृती करण्याची आवश्यक असल्याचे ते म्हणाले. एका लहान चुकीमुळे जीवन गमवू नका. विद्यार्थी व तरुणांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘फेस टू फेस विथ ॲक्सिडेंट व्हिक्टीम’ मध्ये दक्षिण भारतातील पांडेचरी ते त्रीची या मार्गावर अपघातात नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालेल्या श्रीमती राधा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व्यसन करुन वाहन चालवू नये असा संदेश त्यांनी दिला. आजही त्या कॅम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवितात. जनआक्रोशचे श्री. लोणकर यांनी रस्त्यावर जनेतेमध्ये आक्रोश होऊ नये म्हणून संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर वाहतुकीस मदत करण्याचे ठरविले. सेवानिवृत्त असूनही ते दररोज 1 तास सेवा वाहतुक निट करण्यासाठी देतात. वाहतूकीचे नियम पाळा व आपले जीव वाचवा, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी प्राचार्य डॉ. डायगव्हाणे यांनी ‘कोशिश करने वालों की कभी हार नही होती’, ‘सुरक्षा जीवन का अर्थ है’, ‘सुरक्षा बिना सब व्यर्थ’ असा संदेश देवून सर्वशाळा, महाविद्यालयात रस्ता सुरक्षा कार्यक्रम राबवून समाजात जनजागृती करावी, स्वयंसेवी संस्थांनीही यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. बत्तीस वर्षाच्या सेवा काळात अपघात विरहित वाहन चालविणारे इमामवाडा डेपोचे मोहम्मद कादीर व इमामवाडा डेपोचे इस्तृजी मेश्राम या राज्य परिवहन महामंडळातील वाहन चालकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तंत्र निकेतनच्या विद्यार्थ्यांच्या चमूने व्यसन करुन वाहन चालविणे कसे धोकादायक असते याबाबत पथनाट्य सादर केले. अपघात कमी होण्यास मदत करणारे रेडियम स्टिकर चार चाकी व दू-चाकीला मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. या कार्यक्रमास तंत्रनिकेतनचे प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 00000

No comments:

Post a Comment