Wednesday 10 February 2021

नागपूर जिल्हयातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पोस्ट कोविड सेंटर अधिक सक्षम करावे - डाॅ. दीपक म्हैसेकर नागपूर, दि. 10 : कोरोनाचा प्रादुर्भाव होवून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या रुग्णांच्या शारीरिक व मानसिक समस्यांचे निराकरण करुन त्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार तात्काळ मिळावेत, यासाठी पोस्ट कोविड सेंटर अधिक सक्षम करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांचे कोरोना विषयक सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच कोविड लसीकरणाबाबत उच्चस्तरीय बैठक बचत भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी श्री. म्हैसेकर बोलत होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, डॉ. देव, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकर, तसेच जिल्हा टास्क फोर्सचे मेंबर्स डॉ. मिलींद भुरसुंडी, डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. पाटील, डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ व तज्ज्ञ उपस्थित होते. कोविड लसीकरणाबाबत लाभार्थ्यांमध्ये काही प्रमाणात उदासिनता दिसत आहे. याबाबत श्री. म्हैसेकर म्हणाले की, लसीची निर्मिती, त्याचा उपयोग, त्यामुळे शरीरावर होणार परिणाम याबाबत लाभार्थ्यांना लसीकरणाच्या वेळी आगाऊ माहिती देण्यात यावी. लसीकरण झाल्यानंतर शरीरामध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्यास वेळ लागतो. म्हणून ती विकसित होईपर्यंत त्या व्यक्तीस कोविडची बाधा होऊ शकते. यामुळे लसीकरण झाल्यानंतरही कोविड मार्गदर्शिकेचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करण्यात यावी. कोविड योद्धांना कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लसी देण्यात येतात. इतर लसीप्रमाणेच या दोन्हीही सारख्याच सुरक्षित आहेत. लसीकरणासाठी कोविन ॲपमध्ये करण्यात येणाऱ्या नोंदींवर लक्ष ठेवावे. भारत सरकारने लसीकरणाच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांचे तसेच कोविड उपचार मार्गदर्शिकेमध्ये येणाऱ्या नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत प्रशासनामार्फत घरोघरी जाऊन कोविडचे रुग्ण शोधण्यात आले आहेत. या उपक्रमातील माहितीचा वापर करुन कोविड लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोविडची परिस्थिती नियंत्रणात येत असून शाळांमध्ये कोविड संदर्भातील आरोग्य यंत्रणेने दिलेले सर्व सुरक्षा नियम, अटी पाळण्यात येत आहे की नाही, याबाबत विशेष लक्ष पुरवावे. खाजगी रुग्णालयामध्ये कोविडबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऐनवेळी नकार देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. असे सांगून श्री. म्हैसेकर म्हणाले, यावर महापालिकेने नियंत्रण आणावे. विदर्भामध्ये अकोला, भंडारा तसेच यवतमाळ येथील कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोविड मार्गदर्शिकेचे पालन योग्य रितीने व्हावे यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. तसेच डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करावे. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु धोका कायम असल्यामुळे सर्वांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन केले. नागपूरमध्ये तातडीने रुग्ण संख्या कमी झाली पाहिजे सोबतच चाचण्यांची संख्या वाढविणे आणि या आजाराबाबतच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्याचेही त्यांनी निर्देश दिले. *****

No comments:

Post a Comment