Wednesday 10 March 2021

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेची अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी नागपूर, दि.10 : कुही तालुक्यात लिंग गुणोत्तर तपासणीत मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले आहे. मुलांमुलींतील गुणोत्तर प्रमाण तपासणीवर प्रामुख्याने भर द्या. त्यासाठी गावातील ग्रामसेवकांकडून जन्म दाखले तपासा. मुलींचे प्रमाण वाढण्यावर जास्त लक्ष देवून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेस गती द्या व योजना प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्या. केंद्र पुरस्कृत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी विजया बनकर, हेमा बढे, शिवनंदा लंगडापूरे, तहसीलदार राहुल सारंग व महिला व बाल विकास विभागाच्या अधिकारी यावेळी उपस्थित होत्या. तालुक्यातील महसूल उपविभागात लिंग गुणोत्तराबाबत कारणमीमांसा तपासून घ्यावी. आशा वर्कर ग्रामीण भागात सक्रीय असतात, त्यांना या कामात सहभागी करुन तपशीलवार प्रमाण तपासावे. तसेच गर्भपाताबाबत माहिती घ्यावी, तरच ही योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. समृध्द लोकांची मानसिकता बदलण्यासाठी स्वयंसेवी महिला संघटनेची मदत घेवून त्यांचे समुपदेश करा. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहावीनंतर शैक्षणिक प्रवाहातून गळती होते, ती थांबवण्यावर भर द्या. यासाठी माध्यमातील महिला प्रतिनिधीचे सहकार्ये घेऊन मुलांमुलींचे व्यस्त गुणोत्तर कमी करा. स्वयंसेवी संस्थेसोबतच गावातील उमेद कार्यकर्त्या, कृषी सखी, पशुसखींच्या माध्यमातून समुपदेशन करुन गरोदर मातेचे सर्व्हेक्षण करा व त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. या माध्यमातून बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना यशस्वी करा, असे त्यांनी सांगितले. सक्रीय राहील्यास चांगले काम निश्चितच शक्य आहे. महिलांविषयी शिक्षण, आरोग्य तसेच इतर बाबींचा विचार करुन महिलांचा सर्वांगिण विकास कसा साध्य होईल या सकारात्मक विचारधारेतून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची पोलीस स्टेशनमधून माहिती घ्या. देशातील 100 अत्याचारग्रस्त शहरात नागपूरचा 25 वा क्रमांक आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अत्याचार कमी करण्यावर भर द्या. आश्रमशाळांना भेट देवून तेथील मुलींची परिस्थिती जाणून घ्या. खाजगी शाळेत मुलींसाठी स्वतंत्र बाथरुमची व्यवस्था तसेच त्यासाठी महिला सेवक आहेत काय, हे तपासण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तालुका समन्वयकाकडून महिला बचत गटाची माहिती घ्या. व्यवस्थेला जागृत करण्याचे काम करायचे आहे. जनतेमध्ये मुलींबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करा. जागरुक समाज निर्माण करण्‍यासाठी जनजागृती हे एकमेव कार्य असून जिल्हयातील मुलींच्या जन्मदर प्रमाण वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करा. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जनजागृती करा. बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेच्या सफलतेसाठी जिल्हास्तरीय जिंगल्स स्पर्धेचे आयोजन करा. समाजातील संवाद वाढवा. कल्पकतेस चालना देवून योजनेस गती द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. 00000

No comments:

Post a Comment